माजलगाव तालुक्यात वीजचोरी करणाऱ्या २५० जणांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:34 IST2019-11-08T17:55:08+5:302019-11-08T18:34:47+5:30
तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी धाड

माजलगाव तालुक्यात वीजचोरी करणाऱ्या २५० जणांविरोधात कारवाई
माजलगाव : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात कारवाई केली. तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी धाड टाकून वीजचोरी करणाऱ्या जवळपास २५० जणांविरोधात कारवाई केली.
माजलगांव शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. त्याच बरोबर शहरात आणि तालुक्यात हजारो व्यवसाय आहेत. मात्र शहरात ६ हजार ५०० तर तालुक्यात १२ हजार ५०० ग्राहक आहेत. यामुळे तालुक्यात वीजचोरी मोठयाप्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले. यावर काही कारवाई होत नसल्याने काही नागरिक बिनधास्तपणे आकडे टाकून वीजचोरी व मिटरमध्ये छेडछाड करत असत. यामुळे तालुक्यात वीजगळतीचे प्रमाण ५० टक्यापर्यंत पोहचले आहे यातच तालुक्यात वीजबीलाची थकीत बाकी ९ कोटी ५० लाख रुपये आहे.
महावितरणच्या पथकाने गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये धाड टाकली. या ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या २५० जणांवर कारवाई करण्यात आली. पथकांमध्ये उप विभागीय अभियंता सुहास मिसाळ यांच्यासह, कनिष्ठ अभियंता चेतन चोधरी, मयूर अमरे, प्रताप इंगळे सहायक अभियंता व जवळपास ४० होते. वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याचे उपकार्यकरी अधिकारी सुहास मिसळ यांनी सांगितले. तसेच वीजचोरांविरोधात ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.