अपघात की घातपात ? बीडमध्ये बसस्थानकात आढळला युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:23 IST2018-01-15T14:21:19+5:302018-01-15T14:23:10+5:30
रविवारी मध्यरात्री येथील बसस्थानकात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्यावेळी हा खून असल्याचे बोलले जात होते. परंतु सकाळी याची चर्चा अपघातात झाली. त्यामुळे हा घातपात की अपघात? याबाबत शहरात चर्चेला उधान आले असून पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

अपघात की घातपात ? बीडमध्ये बसस्थानकात आढळला युवकाचा मृतदेह
बीड : रविवारी मध्यरात्री येथील बसस्थानकात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्यावेळी हा खून असल्याचे बोलले जात होते. परंतु सकाळी याची चर्चा अपघातात झाली. त्यामुळे हा घातपात की अपघात? याबाबत शहरात चर्चेला उधान आले असून पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
कचरू ढोले (३८ रा.बार्शी नाका, बीड) असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार ढोले हे मजूरी काम करतात. रविवारी त्यांनी मजूरी केल्यानंतर ते बसस्थानकात आले होते. परंतु ते कोणत्या कामासाठी बसस्थानकाकडे आले होते, हे अस्पष्ट आहे. ढोले यांच्या कानाच्या बाजूला मोठी जखम झाल्याचे सांगण्यात आले. परंतु ही जखम खाली पडल्याने किंवा मारहाणीतही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, माहिती समजताच रात्री अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी स्थानकात धाव घेतली. सध्या मृतदेह जिल्हा रूग्णालयात असून शवविच्छेदन केले जात आहे. ढोले यांचा घातपात झाला की अपघात झाला, याबाबत संशय असून ते शवविच्छेदन अहवालात व तपासानंतर पुढे येईल, असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
बसने उडविल्याची चर्चा
दरम्यान ढोले यांचा मृत्यू बसने उडविल्याने झाला, अशी चर्चा शहरभर होती. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. बसने धडक दिली असती तर ढोले यांच्या शरीरावर इतरत्रही जखमा झाल्या असत्या. परंतु त्यांच्या केवळ कानाजवळ जखम झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच खून म्हणावा तर एवढ्या छोट्या जखमेने मारण्यासाठी कुठल्या तरी धारदार शस्त्राचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. हे प्रकरण सध्या तरी गुंतागुंतीचे असून पोलीस गतीने तपास करीत आहेत.