नगरच्या जवानांच्या गाडीला बीडमध्ये अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:29 AM2017-12-04T00:29:18+5:302017-12-04T11:48:55+5:30

बीड : परळी येथील जवानाला सलामी देण्यासाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला बीड -परळी राज्य रस्त्यावरील संगमजवळ अपघात झाला. यामध्ये दोघे ...

Accident of Beed in the train of Nagar Jawan | नगरच्या जवानांच्या गाडीला बीडमध्ये अपघात

नगरच्या जवानांच्या गाडीला बीडमध्ये अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देदोन गंभीर; नऊ किरकोळ जखमी

बीड : परळी येथील जवानाला सलामी देण्यासाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला बीड-परळी राज्य रस्त्यावरील संगमजवळ अपघात झाला. यामध्ये दोघे गंभीर, तर ९ जण किरकोळ जखमी झाले. हे सर्व जवान अहमदनगर येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रातील आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती व बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

परळी येथील मुरलीधर शिंदे या जवानाचा चंदीगढ येथे आजाराने मृत्यू झाला. रविवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात परळी येथे अंत्यस्कार होणार होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगरहून भारतीय लष्कराच्या १५ जवानांची तुकडी सैन्यदलाच्या वाहनातून परळीकडे निघाले होते. अचानक समोरून वाहन आल्याने चालकाने ब्रेक मारले. यामुळे वाहन पलटी होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन कलंडले. यामध्ये समोर बसलेल्या एका जवानासह पाठीमागील दहा-बारा जण जखमी झाले. किरकोळ जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन जवानांना आधार दिला, तसेच इतर सुविधा देण्याबाबत रुग्णालय प्रशासनास सूचना दिल्या. जवानांच्या गाडीला अपघात झाल्यामुळे परळी पोलिसांनी शिंदे यांना शेवटची मानवंदना दिली.

यांनी केली मदत
बीड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सोनपेठहून नगरसेवक नितीन भाडुळे, संदीप लष्करे, भागवत कदम, संदीप रत्नपारखे, लक्कीसिंग शाहू येत होते. हा अपघात दिसताच त्यांनी स्वत:च्या वाहनातून जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले.

जखमींची नावे
या अपघातात शहाजी नायक, प्रवीण थोरात हे दोघे गंभीर जखमी आहेत, तर सोमलाला सिंग, रामरूप रिसोडा, रवींद्रसिंग सोमलाला, अंग्रेजसिंग भोलासिंग, धर्मेंद्र कुमार गणपत प्रसाद, रघुवीरसिंग, रामनिवास आणि मानसिंग हे किरकोळ जखमी आहेत. काही जखमींना माजलगाव व अंबाजोगाईला हलविण्यात आले आहे. त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Accident of Beed in the train of Nagar Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.