लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास
By सोमनाथ खताळ | Updated: December 20, 2023 21:30 IST2023-12-20T21:30:25+5:302023-12-20T21:30:36+5:30
पाटोदा-परळी प्रवासादरम्यानची घटना, तक्रार देण्यासाठी पोलिसांची टोलवाटोलवी

लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास
सोमनाथ खताळ, बीड : बस प्रवासात एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन शेजारी बसली. दाम्पत्याची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील तब्बल १६ तोळे दागिने लंपास केले. ही घटना १८ डिसेंबर रोजी पाटोदा ते परळी प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणात तक्रार देण्यासाठी परळी व पाटोदा पोलिसांनी टोलवाटोलवी केली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशीकला ढाकणे (वय ५१ रा.परळी) या पती नामदेव ढाकणे यांच्यासह पुण्याहून शिवशाही बसने परळीला १८ डिसेंबर रोजी येत होत्या. त्यांची बस पाटोदा येथे दुपारी पोहचल्यानंतर एक महिला तिच्या मुलासह या बसमध्ये बसली. ही महिला प्रारंभी शशीकला ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला नामदेव ढाकणे यांच्या शेजारील दुसऱ्या सिटवर बसवले. थोड्या वेळाने ही महिला नामदेव ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला शशीकला यांच्या शेजारी बसवले. दरम्यानच्या काळात मस्साजोग येथे बस येताच ही महिला उतरुन गेली. त्या आगोदरच तिने ढाकणे यांच्या पिशवीतील सोने, चांदीचे जवळपास ५ लाख १२ हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले.
ढाकणे दाम्पत्य परळीत गेल्यानंतर त्यांना बॅगची चेन अर्धी उघडी दिसली. त्यांनी बॅग तपासल्यावर दागिने नसल्याचे समजले. त्यांनी लागलीच परळीतील संभाजीनगर व शहर पोलिसांत धाव घेतली. परंतू त्यांनी तक्रार घेण्याऐवजी पाटोद्याला जा, असा सल्ला दिला. पाटोदा पोलिसांनीही सुरूवातीला टाळाटाळ केली. परंतू यात वरिष्ठांकडे व्यथा मांडताच त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला.