बीडच्या ‘बावडी’त प्राचीन खगोलीय ज्ञानाचा 'खजाना'; पृथ्वी-चंद्राच्या अंतराचे रहस्य उलगडते!
By सोमनाथ खताळ | Updated: November 24, 2025 14:30 IST2025-11-24T14:28:30+5:302025-11-24T14:30:04+5:30
विहीर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे, तर ‘ज्ञानाचा खजिना’; सम्राट राहुल सरोदे यांच्या संशोधनातून नवा वैज्ञानिक दृष्टिकोन

बीडच्या ‘बावडी’त प्राचीन खगोलीय ज्ञानाचा 'खजाना'; पृथ्वी-चंद्राच्या अंतराचे रहस्य उलगडते!
बीड : बीड शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक खजाना बावडी (विहीर) ही केवळ एक जुनी वास्तू नसून, ती प्राचीन खगोलशास्त्र आणि भूगोल या विषयांचे गूढ ज्ञान स्वतःमध्ये सामावून आहे, असा निष्कर्ष पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद सम्राट राहुल सरोदे यांनी केलेल्या सखोल अभ्यासातून समोर आला आहे.
स्थानिक लोक या विहिरीला ‘खजाना बावडी’ म्हणतात; पण सरोदे यांच्या मते उर्दूमध्ये ‘बीर का खजाना’ म्हणजे ‘ज्ञानाचा खजिना’ या अर्थाने हे नाव अधिक योग्य आहे. विहिरीच्या बांधकामात पृथ्वीचा व्यास, परीघ आणि चंद्र-पृथ्वीचे अंतर जाणूनबुजून समाविष्ट केले आहे.
बांधकामातील अचूक वैज्ञानिक आकडे
पृथ्वीचा व्यास आणि परीघ : बावडीतील आतील वर्तुळाचा व्यास (१२.५४७ मीटर) हा पृथ्वीच्या वैज्ञानिक व्यासाच्या आकड्याशी (१२,५४७ किमी) तंतोतंत जुळतो. त्याचप्रमाणे, या वर्तुळाचा परीघही (३९.४१९ मीटर) पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाशी (३९,४१९ किमी) साधर्म्य दर्शवतो.
पृथ्वी-चंद्राचे अंतर : बाह्य वर्तुळाची लांबी विशिष्ट पद्धतीने मोजल्यास येणारा आकडा (३,५७,७२३ किमी) हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सर्वात कमी अंतराच्या आधुनिक वैज्ञानिक मोजमापाशी जुळतो.
खाली उतरण्यासाठी १५ पायऱ्या
विहिरीतील ३५९ किष्कू अंगुल व्यास (प्राचीन भारतीय मोजमाप) हा पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षावर फिरण्याच्या गणिताशी जोडलेला आहे आणि विहिरीत खाली उतरण्यासाठी असलेल्या १५ पायऱ्या चंद्राच्या अमावास्या ते पौर्णिमा या दरम्यानच्या कला दर्शवतात, असेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
वारसा वाचवण्यासाठी तातडीची गरज
पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळत असलेल्या या बावडीचा परिसर सध्या कचरा फेकणे, प्लास्टिक आणि भिंतींवरील लेखनामुळे बाधित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, हा सांस्कृतिक वारशावर सरळ धक्का आहे. त्यामुळे बावडीच्या संवर्धनासाठी सीसीटीव्ही, २४ तास सुरक्षा कर्मचारी, माहिती फलक आणि नियमित स्वच्छतेची तातडीने गरज आहे.
नागरिकांचे सहकार्य आणि पितृसेवा
सरोदे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या स्वच्छता मोहिमेत राहुल मस्के, किशोर मस्के, पूजा मस्के, विकी मस्के, अवनी मस्के यांसह अनेक तरुण आणि महिलांनी उत्साहाने भाग घेऊन विहिरीच्या परिसराला नवे रूप दिले. ‘पूर्वजांच्या आत्म्यास शांती हवी असेल, तर त्यांनी निर्माण केलेल्या वारशाचे जतन करणे हीच खरी पितृसेवा आहे,’ असे आवाहन आर्किटेक्ट सम्राट राहुल सरोदे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार
हा अहवाल बनविण्यासाठी पुण्याहून बीडला चार ते पाच वेळा चक्कर झाल्या. बीडमधील अनेकांच्या मदतीने हे संशोधन आठवड्यापूर्वी पूर्ण केले. याचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. आता यातून पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर किती उपाययोजना करतात, याकडे लक्ष लागले आहे.
समर ट्रँगल आणि खजाना विहीर यांचा संबंध
समर ट्रँगल हा अभिजित, श्रवण आणि हंस या तीन तेजस्वी ताऱ्यांनी बनलेला त्रिकोण आहे, जो तेज आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. संशोधनानुसार, खजाना विहिरीची अंतर्गत रचना या ट्रँगलशी जुळते.