जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:37 PM2022-05-27T18:37:47+5:302022-05-27T18:39:07+5:30

पतीवर हल्ला होत असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करत बाजूला केले.

A deadly attack on a backward family over a land dispute; Three seriously injured | जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

Next

दिंद्रुड (बीड):  जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांनी एका मागासवर्गीय कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथे गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. जबर मारहाणीत मागासवर्गीय शेतकरी पती-पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, उन्हाळा संपत आला असून खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे. शेतकरी शेत दुरुस्तीला लागले असून आहेत.  कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बालासाहेब रोहिदास उजगरे हे गुरुवारी सकाळी शेतीत काम करत असताना शेजारील अजय भानुदास तिडके व सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. उजगरे यांनी त्यांना शेतात दगडे टाकण्यास मज्जाव केला. 

दगडे टाकण्यास अडविल्याचा राग आल्याने अजय भानुदास तिडके, सिद्धेश्वर भानुदास तिडके, मच्छिंद्र विठ्ठल तिडके, भानुदास विठ्ठल तिडके, चंद्रसेन विठ्ठल तिडके, रजनीकांत मच्छिंद्र तिडके, प्रतीक चंद्रसेन तिडके, अर्जुन कुंडलिक तिडके व कुंडलिक विठ्ठल तिडके ( सर्व राहणार बोडका, ता. धारूर ) यांनी उजगरे कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. जबर मारहाणीत बालासाहेब उजगरे, त्यांची पत्नी शकुंतला उजगरे, मुलगा निखील उजगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुरुवारी (दि.२६) रात्री बालासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती आहे. 

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल 
उजगरे यांच्यावर नऊ जणांनी अचानक लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. पतीवर हल्ला होत असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करत बाजूला केले. यानंतरही पत्नी हल्लेखोरांना विनवण्या करत होती. याकडे दुर्लक्ष करत कसलीही दया-माया न दाखवत हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ करत, लाठ्याकाठ्या, दगडाने उजगरे कुटुंबास जबर मारहाण केली. या संतापजनक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: A deadly attack on a backward family over a land dispute; Three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.