‘फिट इंडिया’त बीड जिल्ह्यातील ८७३ शाळा अनफिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST2020-12-30T04:42:44+5:302020-12-30T04:42:44+5:30
बीड : विद्यार्थ्यांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत देशभरातील शाळा, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे ...

‘फिट इंडिया’त बीड जिल्ह्यातील ८७३ शाळा अनफिट
बीड : विद्यार्थ्यांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत देशभरातील शाळा, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले असले तरी २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २४ टक्के शाळांनी नोंदणीच केली नसल्याचे दिसून आले आहे. ३७०७ शाळांपैकी २८३४ शाळांची नोंदणी झाली होती. या योजनेत देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची फिटनेस टेस्ट घेण्याचे निर्देश आहेत. ‘फिट इंडिया फिटनेस का जोड, आधा घंटा रोज’, फिटनेस असेसमेंट थ्रू फिट इंडिया ॲप, स्कूल विक, फिट इंडिया प्रभात फेरी, सायक्लोथॉन, आदींबाबत सूचना दिल्या होत्या. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले; परंतु इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचा व रिक्त असेल तर इतर पाठ्यक्रमाचा तास हाेतो. त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यायामातून सुदृढता आणणे सध्या शाळांपुढे अशक्यप्राय बनले आहे. जिल्ह्यात ४ मुख्य प्रशिक्षकांमार्फत ३५४ क्रीडा शिक्षकांना फिट इंडियाबाबत प्रशिक्षण दिले आहे, तसेच कोविड-१९ मुळे फिट इंडिया मोहिमेला खोडा बसला आहे. यातच पोर्टलवर लिंकद्वारे नोंदणी, ॲपद्वारे विद्यार्थ्यांचे स्वयं मूल्यमापन आदी प्रक्रिया नोंदविताना दमछाक होणार आहे. बहुतांश शाळा तंत्रस्नेही शिक्षकांकरवी नाेंदणी करीत आहेत, तर मैदानावरचे अनेक गुरुजी ऑनलाइन नोंदणी, ॲप आदी तांत्रिक कार्याबाबत अनभिज्ञच असून, ते इतरांच्या माध्यमातून हे कार्य करीत आहेत.
फिट इंडिया हा केंद्र शासनाचा उपक्रम असून, क्रीडा विभागामार्फत राबविला जात आहे. माध्यमिक विभागांच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक आहेत. जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात नोंदणी करून सहभाग नोंदवावा.
विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.)
फिट इंडिया उपक्रमांतर्गत पुणे येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या चार प्रशिक्षित शिक्षकांनी फिट इंडियाबाबतचे प्रशिक्षण दिलेले आहे. विद्यार्थी सुदृढ राहावेत, तसेच गुणी खेळाडू विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडाधिकारी, बीड.
पहिली ते बारावीपर्यंतची शाळा, महाविद्यालये-
३७०७
शिक्षक ३७०७
एकशिक्षकी शाळा ०००
बहुतांश शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांची पदे उडाली आहेत, तर अनेक शाळांमध्ये खेळाचे वेळापत्रकच हरवले आहे. क्रीडा शिक्षकाऐवजी दुसरेच प्रभारी शिक्षक खेळाऐवजी वर्गातील उपक्रम अथवा विषय शिकवितात.