इंग्रजी आंतरराष्ट्रीय परिषदेत ८३२ संशोधक ऑनलाइन सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:48+5:302021-04-11T04:32:48+5:30
आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात ‘डायस्पोरा लिटरेचर’ या विषयावर इंग्रजी विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद ...

इंग्रजी आंतरराष्ट्रीय परिषदेत ८३२ संशोधक ऑनलाइन सहभागी
आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात ‘डायस्पोरा लिटरेचर’ या विषयावर इंग्रजी विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाइन पार पडली. देश विदेशातील इंग्रजी विषयाच्या एकूण ८३२ अध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी या परिषदेत ऑनलाइन सहभाग नोंदवला.
कोरोना काळातील शैक्षणिक धोरणांनुसार व उच्चशिक्षणातील नवीन प्रवाहांनुसार सध्या सर्वच विषयांचे चर्चासत्र व परिषदांचे ऑनलाइन आयोजन केले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष किशोर हंबर्डे यांच्या सूचनेनुसार प्राचार्य डॉ. निंबोरे व नॅक समन्वयक प्रा. नानवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अभय शिंदे म्हणाले, अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रमाणात नोंदणी झाल्याने तांत्रिक बाब लक्षात घेऊन केवळ २५० नोंदणीकृत अध्यापकांना गुगल मीटवर प्रत्यक्ष जॉइन होता आले. इतरांनी यू ट्यूब लिंकवरून सहभाग नोंदवला. ‘डायस्पोरा लिटरेचर’ ही मुख्य थिम असलेल्या या परिषदेत बांगलादेशमधील ढाका सिटी कॉलेजचे डॉ. एल. एम. हुसेन यांनी बीजभाषण केले. डायस्पोरा साहित्याच्या माध्यमातून लेखकांनी नवीन देशांत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेशातील बीजनोर येथील महिला महाविद्यालयाच्या डॉ. आस्था प्रसाद यांनी भारतीय डायस्पोरा साहित्य जगभरात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून या साहित्यातील सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक विविधता वाचकांना आकर्षित करते, असे सांगितले. पश्चिम बंगालच्या मदनापूर महाविद्यालयाचे डॉ. सागीर अली यांनी तिसऱ्या सत्रात वसाहतवाद आणि डायस्पोरा साहित्य यांच्यातील परस्परसंबंध विषद करून उत्तर वसाहतवाद काळात मोठ्या प्रमाणात हे साहित्य निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. प्राध्यापकांनी चॅट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व शंकांचे निरसन गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. आर. निंबोरे यांनी अध्यक्षीय भाषणात कोविडमुळे शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असली तरी स्टाफमधील अनेकांची तांत्रिक कौशल्ये विकसित झाल्याचे नमूद केले. डॉ. अभय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तांत्रिक साहाय्य डॉ. रवी सातभाई यांनी केले तर प्रा. निखिल बनकर यांनी सर्वांचे आभार मानले.