दीड महिन्यात ८० ‘मोस्ट वॉन्टेड’ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:41 IST2018-10-20T00:41:22+5:302018-10-20T00:41:49+5:30
१ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली.

दीड महिन्यात ८० ‘मोस्ट वॉन्टेड’ गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली.
किरकोळ हाणामारीपासून ते खुन, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अनेक वर्षांपासून फरार होते. पाहिजे, फरारी आरोपींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व गुन्हेगारांची माहिती मागविली. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. दीड महिन्यापूर्वी स्थापन केलेल्या या पथकाने १ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले आहे. या पाहिजे, फरारी असलेल्या आरोपींमध्ये काही राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. काही पुढाऱ्यांनी भितीपोटी आगोदरच जामीन करून घेतला आहे तर काही पुढारी, नेते सध्या पोलिसांच्या निशान्यावर आहेत.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, दरोडाचे सपोनि गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश दुधाळ, भास्कर केंद्रे, दिलीप गलधर, अंकुश महाजन, सखाराम सारूक, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.