खळबळजनक ! अंबाजोगाईत एकाच तासात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू; स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:06 IST2021-04-21T18:05:16+5:302021-04-21T18:06:19+5:30
6 corona patients die in one hour in Ambajogai : मृत्यू गंभीर आजारानेच झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा

खळबळजनक ! अंबाजोगाईत एकाच तासात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू; स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील घटना
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड कक्षात बुधवारी दुपारी एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दिवसभरात एकूण ११ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. गंभीर आजार व जास्त वय असल्याने रुग्णांचे मृत्यू झाल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवभरात ११ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. तर दुपारी १ ते २ या वेळेत एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कक्षाच्या अतिदक्षता विभागातील ३ आणि वार्ड क्रमांक-३ मधील ३ अशा सहा रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला. स्वाराती मधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मृतांच्या अँटीजेन टेस्ट केल्याने संशय गडद
स्वाराती रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटीव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. आजच्या घटनेतील मयत रूग्णांची मात्र घाईगडबडीत अँटीजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविल्याने प्रशासन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय गडद झाला आहे.
मृत्यू गंभीर आजारानेच झाल्याचा प्रशासनाचा दावा
बुधवारी रात्री १२ ते आतापर्यंत कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेले मृत्यू हे दमा, हायपरटेंशन, उच्च रक्तदाब व इतर शारीरिक व्याधी यामुळे झाले आहेत. तसेच बहुतांश रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे.
- डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, अंबाजोगाई.