प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2023 16:04 IST2023-03-24T16:04:05+5:302023-03-24T16:04:19+5:30
लाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात
बीड : खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी अमित नाना तरवरे (वय ३२ रा.नाईकनगर तांडा, गेवराई) या तलाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी गेवराईत करण्यात आली.
अमित तरवरे हा गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे. परंतू त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तरवरे याने तीन हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे शुक्रवारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर पंचासमक्ष तीन हजार रूपये घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी आदींनी केली.