वाटमारी प्रकरणातील ३ संशयित पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:50+5:302021-05-25T04:37:50+5:30
केज : केज ते धारूर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारास तांबवा शिवारात अडविले. अंगावर थुंकल्याच्या कारणावरून स्कुटी आडवी लावून वाटमारी करून ...

वाटमारी प्रकरणातील ३ संशयित पोलिसांच्या ताब्यात
केज : केज ते धारूर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारास तांबवा शिवारात अडविले. अंगावर थुंकल्याच्या कारणावरून स्कुटी आडवी लावून वाटमारी करून एक मोबाईल व खिशातील पैसे काढून घेत मारहाण केली होती. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना केज पोलिसांनी २४ मे रोजी अटक केली आहे.
धारूर तालुक्यातील चोरांबा येथील रहिवासी गौतम ज्ञानोबा भालेराव हे १० मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून केजवरून चोरांब्याकडे जात असताना कासारी पाटीच्या पुढे तांबवा शिवारात एका काळ्या स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी रस्त्यावर आडवी लावून, ‘तू आमच्या अंगावर का थुंकलास ’असे म्हणत चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच खिशातील रोख ५ हजार ७०० रुपये आणि मोबाईल असा एकूण १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल वाटमारी करून लुटून नेला होता. याप्रकरणी गौतम भालेराव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि गुन्हे तपास शाखेचे जमादार दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, अशोक नामदास, गृह रक्षक दलाचे जवान बाळासाहेब थोरात यांनी परिश्रम घेऊन परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची सविस्तर माहिती मिळविली. तसेच गुप्त खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन धारूर येथील अनिल उर्फ मंगेश बाला सोनटक्के (रा. अशोकनगर, धारूर) शिवराम वैजनाथ बोबडे (संभाजीनगर, धारूर) व सोपान नखाते (कसबा विभाग, मठ गल्ली, धारूर) या तिघांना संशयावरून अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, यात त्यांचा सहभाग असल्याची पोलिसांना खात्री आहे.