कारचे लॉक तोडून औरंगाबादच्या व्यापाऱ्याचे २५ लाख पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:12 IST2020-11-12T19:11:31+5:302020-11-12T19:12:29+5:30
परळीतील मोंढा येथील मार्केटमध्ये झाली चोरी

कारचे लॉक तोडून औरंगाबादच्या व्यापाऱ्याचे २५ लाख पळवले
परळी : शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहून आलेल्या एका व्यापाऱ्याची लॉक केलेल्या कार मधून 24लाख 97 हजार रुपयाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील चोरास पोलिसांनी अटक केलेली नव्हती.
याबाबत माहिती अशी की ,औरंगाबाद येथील संजय गंगवाल हे गुरुवारी सकाळी परळी शहरात पेपर कप विक्री व वसुलीच्या निमित्त्याने आले होते. त्यांनी त्यांची कार मोंढ्यातील श्री हनुमान मंदिर जवळ पाण्याच्या टाकीजवळ लावण्यास वाहन चालकाला सांगितले. यानंतर गंगवाल हे गाडीतून उतरून एका व्यापाऱ्याकडे गेले. तर चालक गाडी लॉक करून नाष्टास गेला. याच वेळेत कारचे लॉक उघडून चोरट्यांनी आतील पैश्याची व वाहनचालकाची कपड्याची बॅग पळवली.
नाश्ता करून आलेल्या वाहन चालकास कारचे लॉक उघडलेले दिसले. त्याने लागलीच गंगवाल यांना बॅग चोरीचां प्रकार सांगितला. संजय गंगवाल यांच्या बॅगमध्ये वसुलीची 24 लाख 97 हजार रुपये रक्कम होती. त्यानंतर गंगवाल यांनी परळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक खरात हे करत आहेत.