भटक्या कुत्र्यांनी मारल्या २४ शेळ्या; धारूर डोंगरपट्ट्यात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:40 IST2020-11-06T16:37:42+5:302020-11-06T16:40:18+5:30
कुत्र्यांनी आता परिसरातील डोंगरपट्टीच्या भागाकडे मोर्चा वळवत जंगली प्राण्यासह पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे.

भटक्या कुत्र्यांनी मारल्या २४ शेळ्या; धारूर डोंगरपट्ट्यात दहशत
धारूर : तालुक्यातील डोंगरपट्ट्यात भटक्या कुत्र्यांची दहशत असून सदरील कुत्री जंगली प्राण्यांसह पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याचे दिसून येत आहे. जहाँगीर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची २४ शेळ्यांची पिल्ले या कुत्र्यांनी मारल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.
शहर व तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांनी आता परिसरातील डोंगरपट्टीच्या भागाकडे मोर्चा वळवत जंगली प्राण्यासह पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे. तालुक्यात वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हरिण, ससे, साळींदरसारखे प्राणी व मोर, लांडोर, चित्तरसारख्या पक्षांची संख्या मोठी आहे. या प्राणी व पशूंची शिकार करण्यासाठी पाच ते दहा भटक्या कुत्र्यांची टोळी डोंगरात सक्रिय आहे. या कुत्र्यांनी आता शेळ्यासारख्या पाळीव प्राण्यांनाही लक्ष करणे सुरु केले आहे.
बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तालुक्यातील जहाँगीर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची तब्बल २४ शेळ्या या कुत्र्यांनी फस्त केल्याचे बुधवारी रात्री उघड झाले. शहरातील बामदरी, मुहपसारी, नागदरा, मंत्रीदरा परिसरातही कुत्र्यांची दहशत आहे.जहाँगीर मोहा परिसरातील वाघदरा व डोलदरा भागात ४ नोव्हेंबर रोजी १० तर ५ नोव्हेंबर रोजी आठ ते दहा महिने वयाची शेळ्यांची पिल्ले मृत आढळली. जहाँगीर मोहा येथील शामू सीताराम मंदे, बप्पा दादाराव मंदे, आश्रूबा रानबा चिरके या शेळीपालकांचे जवळपास ७० ते ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करुन शेळीपालकांना मदत करावी अशी मागणी होत आहे.