एटीएम कार्डची अदलाबदल करुन 2 लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:39 IST2018-10-01T19:38:41+5:302018-10-01T19:39:25+5:30
एटीएम मधून पैसे काढून दिल्यानंतर कार्डची अदलाबदल करुन तब्बल 2 लाख 7 हजार रुपय काढून घेतल्याची घटना नविन बसस्थानक परिसरात घडली.

एटीएम कार्डची अदलाबदल करुन 2 लाखाची फसवणूक
माजलगाव (बीड ) : एटीएम मधून पैसे काढून दिल्यानंतर कार्डची अदलाबदल करुन तब्बल 2 लाख 7 हजार रुपय काढून घेतल्याची घटना नविन बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात ठगाविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मेवाडी येथील देवनाथ कुंडलीक यादव हे शनिवारी (दि.29) एटीएममधुन 2 हजार रुपये काढण्यासाठी सायंकाळी नविन बसस्थानक परीसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. पैसे काढतांना त्यांना काही तांत्रिक अडचण येत होती. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनोळखी इसमाने मदत करत त्यांना 2 हजार रुपये काढून दिले.
यानंतर त्याने कार्डची अदलाबदल करत यादव यांना दुसरे कार्ड दिले. हा प्रकार देवनाथ यादव यांच्या लक्षात न आल्याने कार्ड घेवून गावाकडे गेले. दोन दिवसांनतर त्यांना मोठ्या प्रमाणात इंग्रजीत संदेश येत होते. या मेसेज बाबत त्यांनी गावात विचारणा केली असता हे मेसेज बँकेचे असून पैसे काढल्याचे मेसेज असल्याचे सांगण्यात आले. यादव यांनी तात्काळ बँक गाठून याची चौकशी केली. त्यांच्या खात्यामधून 2 लाख 7 हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले. यावरून त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीसांनी तीन ठिकाणचे सिसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.