बीडमधील १,८३९ मुले कोल्हापूरच्या फडात; ‘लोकमत’च्या बातमीवर सुमोटो याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 05:38 IST2024-08-06T05:38:04+5:302024-08-06T05:38:34+5:30
उलट तपासणीमध्ये ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.

बीडमधील १,८३९ मुले कोल्हापूरच्या फडात; ‘लोकमत’च्या बातमीवर सुमोटो याचिका
सोमनाथ खताळ
बीड : बीड जिल्ह्याच्या विविध भागातील ० ते १८ वयोगटातील तब्बल १,८३९ मुले कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ११ कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत होती. ही बाब कोल्हापूरच्या ‘अवनी’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती. उलट तपासणीमध्ये ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.
बीड शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांनी यासंदर्भात काही शाळांची तपासणीदेखिल केली होती. हाच प्रकार ‘लोकमत’ने १२ मार्च आणि २४ मार्च २०२४ रोजी वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. याचीच दखल घेत मानवी हक्क आयोगाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. यावर आता ३१ जुलै रोजी एक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
यांना केली पार्टी
याचिकेत प्रधान सचिव शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यात पार्टी करण्यात आले आहे.
अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली होती. तीन शाळांना भेटी दिल्यावर ही मुले कोल्हापूरमध्ये असतानाही त्यांची हजेरी बीडमध्ये असल्याचे दिसले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात आली.
- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड
कोल्हापूरमध्ये ८० टक्के ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील येतात. त्यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्याची उलट तपासणी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या.
- अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनी संस्था, कोल्हापूर