१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस

By सोमनाथ खताळ | Updated: June 3, 2025 08:01 IST2025-06-03T08:00:44+5:302025-06-03T08:01:12+5:30

दसरा, दिवाळीच्यावेळी मजूर ऊसतोडीसाठी जातात. त्यानंतर शिमगा अथवा पाडव्याला ते परत येतात

16 hours of 'work' like animals and a 'price' of Rs 300-400; A couple cuts as much as 2 tonnes of sugarcane in a day | १६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस

१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस

सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: पहाटे ४ वाजता उठून फडात ऊस तोडायला सुरुवात करायची. ७ वाजता बायका आल्या की न्याहरी करायची. त्यानंतर तोडलेला ऊस बायका बांधतात. वाहन आले तर ठीक, नाहीतर दिवसभर ऊस तोडायचा. सायंकाळी तोडलेला ऊस भरायचा. ट्रक अथवा दोन ट्रॉली ट्रॅक्टर भरायला चार तास पायपीट करायची. तोपर्यंत रात्रीचे ८ ते १० वाजतात. तेथून पुढे घरी जायचे. थोडं फार पोटात टाकून लगेच झोपायचं. सकाळी तोच दिनक्रम. एका दिवसांत जनावरांसारखं १४ ते १६ तास काम करावं लागतं; पण एका व्यक्तीला केवळ ३०० ते ४०० रुपयेच मिळतात; पण काय करणार? पोटासाठी सर्व काही करावं लागतं, अशा भावना ऊसतोड कामगारांनी व्यक्त केल्या.
दसरा, दिवाळीच्यावेळी मजूर ऊसतोडीसाठी जातात. त्यानंतर शिमगा अथवा पाडव्याला ते परत येतात. अनेकदा चार ते पाच महिन्यांतच काहींना परत यावे लागते.

एका जोडीला किती पैसे मिळतात? एका टोळीत किमान ८ ते १० जोड्या असतात. दिवसभरात २० टन ते ऊस तोडू शकतात. एका टनामागे ३६६ रुपये मजुरी कारखाना देतो. तर मुकादमाला ७३ रुपये कमिशन असते. वाहतुकीसाठी वाहन मालकाला १ ते २५ किमीपर्यंत २३० रुपये प्रति टन तर त्यापुढे ३ रुपये ७५ पैसे वाढीव दिले जातात.

कारखान्यानेच थेट मजुरांची भरती करून मुकादमाचे कमिशन मजुरांना द्यावे. समान वेतन कायद्यानुसार आठ तासाला ६०० रुपये आणि १६ तासाला १२०० रुपये एका व्यक्तीला मजुरी द्यावी.
- मनीषा तोकले, सामाजिक कार्यकर्त्या

१० ते ११ वर्षांपासून ऊसतोडीला जातोत. १४ ते १६ तास काम करत असतोत, त्या तुलनेत मजुरी मिळत नाही. ८ तास काम केले तर ६०० रुपये द्यावेत.
- साधना वाघमारे, कामगार, काठोडा, ता. बीड

Web Title: 16 hours of 'work' like animals and a 'price' of Rs 300-400; A couple cuts as much as 2 tonnes of sugarcane in a day

टॅग्स :sugarcaneऊस