बीडमध्ये १५० ब्रास वाळू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:21 IST2019-07-07T00:21:19+5:302019-07-07T00:21:46+5:30
मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला.

बीडमध्ये १५० ब्रास वाळू साठा जप्त
बीड : मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. वाळूचा साठा करेपर्यंत गौण खनिज विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पकडलेली वाळू शासकीय विश्रामगृह परिसरात साठवली जात आहे. महिनाभरापूर्वी राजापूर येथील पकडलेली वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साठवून ठेवली आहे.
वसंत बबनराव कदम यांच्या मालकीची दीडशे ब्रास वाळू बीड शहरातील उत्तमनगरच्या पश्चिमेला साठवून ठेवली असल्याबाबतची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील संतोष बन, नितीन जोगदंड, सचिन सानप यांनी त्या दीडशे ब्रास वाळू साठ्यावर छापा टाकला. पकडलेली वाळू बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात वाहून आणण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. ज्या जागेत वाळू ठेवली होती ती जागा देखील वसंत बबनराव कदम यांच्याच नावावर असल्याचे महसूल विभागातील पथकातील अधिकारी यांनी सांगितले. वाळू साठ्यांवर छापा टाकण्यासाठी पथके तयार केली असली तरी वाळू प्रकरणात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेकडो ब्रास वाळू साठवेपर्यंत जिल्हा प्रशासनाने काय केले? असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.