१३ लाख नागरिक तर १२ हजार आरोग्यकर्मिंना कोरोना होऊन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:31+5:302021-07-24T04:20:31+5:30

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात जून महिन्यात आयसीएमआरच्यावतीने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चौथ्या टप्प्यात सेरो सर्वेक्षण करण्यात ...

13 lakh citizens and 12 thousand health workers were killed | १३ लाख नागरिक तर १२ हजार आरोग्यकर्मिंना कोरोना होऊन गेला

१३ लाख नागरिक तर १२ हजार आरोग्यकर्मिंना कोरोना होऊन गेला

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात जून महिन्यात आयसीएमआरच्यावतीने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चौथ्या टप्प्यात सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला आहे. यात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना व १२ हजार आरोग्यकर्मिंना कोरोना होऊन गेल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील १० गावांमधून ४०३ नागरिक व १०८ आरोग्यकर्मिंचे रक्त नमुने तपासून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा आयसीएमआरने राज्यातील बीडसह सांगली, अहमदनगर, जळगाव, परभणी, नांदेड या सहा जिल्ह्यांत सेरो सर्वेक्षण केले होते. बीड जिल्ह्यातही २१ जून रोजी सर्वेक्षण झाले होते. दरम्यान, प्रत्येक टप्प्यात जिल्ह्याची टक्केवारी वाढत गेल्याचे दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यात २८ टक्के तर आता चौथ्या टप्प्यात ४२ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ३१ लाख सांगण्यात येत आहे. त्या आधारे तब्बल १३ लाख ८ हजार २०० लोकांना कोरोना होऊन गेला आहे.

१०८ पैकी ७९ हेल्थ केअर वर्कर बाधित

तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच चौथ्या टप्प्यातही १०८ हेल्थ केअर वर्कर्सचे रक्त नमुने तपासले. यात तब्बल ७९ कर्मचारी बाधित आढळल्याचे सांगण्यात आले. लसीकरणातील आकडेवारीनुसार, १७ हजार कर्मचारी आहेत. त्यानुसार १२ हजार कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन गेला आहे.

---

एका गावातून ४० रक्त नमुने

एका गावातील चार भागांतून रक्त नमुने घेतले होते. एका भागात ६ ते ९ वयोगटातील १, ९ ते १८ मधील ३ आणि १८ च्या पुढील ६ असे १० नमुने घेण्यात आले होते. एका गावातून ४० असे १० गावांतून ४०३ नमुने घेतले होते.

---

चाैथ्या टप्प्यात ४२ टक्के नागरिक तर ७३ टक्के हेल्थ केअर वर्कर्स यांना कोरोना होऊन गेल्याचे समोर आले आहे. पहिल्यापेक्षा टक्का वाढला आहे.

डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

----

अशी आहे आकडेवारी

तपासलेले रक्त नमुने नागरिक ४०३

पॉझिटिव्ह १७०

टक्केवारी ४२.२

---

हेल्थ केअर वर्कर्स

रक्त नमुने तपासले १०८

पॉझिटिव्ह ७९

टक्केवारी ७३.१

Web Title: 13 lakh citizens and 12 thousand health workers were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.