१२९ कोटींच्या कामाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:15+5:302021-01-13T05:27:15+5:30

: भुयारी गटार, अमृत अटलच्या कामाला गती मिळणार बीड : बीड पालिकेने १२९ कोटींच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे दाखल ...

129 crore work proposal submitted to the government | १२९ कोटींच्या कामाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल

१२९ कोटींच्या कामाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल

: भुयारी गटार, अमृत अटलच्या कामाला गती मिळणार

बीड : बीड पालिकेने १२९ कोटींच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहेत. यामुळे भुयारी गटार आणि अमृत अटल योजनेच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.

सोमवारी बीड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी बीड शहराच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. कामे करून घेण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना भरसभागृहातच झापले. या सभेमध्ये शहरातील सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील अडीअडचणी आणि कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर नगराध्यक्षांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन शहरातील वाहतुकीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. ती तत्काळ पूर्ण करावीत. अंडरग्राउंड ड्रेनेजची कामे पूर्ण करून नंतरच रस्त्याची कामे करावी लागतील, ही कामे खोळंबली आहेत. त्याबाबत नगरपालिकेने देखील तक्रारी दाखल केल्या आहेत, असे नगराध्यक्ष म्हणाले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीअंतर्गत २०२०-२१ या वर्षातील प्रस्तावित कामांना मान्यता देणे, दलितोत्तरअंतर्गत प्रस्तावित कामांना मान्यता देणे, शासन स्तरावर विविध योजनेअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या प्रस्तावित कामांना मंजुरी देणे, अग्निशामन सेवा सुविधा व नगरोत्थान (जिल्हा स्तर) या योजनेअंतर्गत कामांना मान्यता देणे, बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह वार्षिक भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदेस मान्यता देणे, आदी विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.

यावेळी सभागृहात नगरसेवक भीमराव वाघचौरे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यकाळात शहरातील प्रत्येक प्रभागात कुठलाही भेदभाव न करता निधी देऊन विकासकामे केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर सर्वच नगरसेवकांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन केले. तसेच शहरातील १८ डीपी रस्ते आहेत. त्यालगत असलेल्या जवळपास ३० टक्के इमारती नगरपालिकेच्या नोंदणीत नाहीत. त्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न बुडत आहे. या इमारतींच्या नोंदणी करून घ्याव्यात, स्मशानभूमीतील पथदिव्यांची उंची कमी करून त्या ठिकाणच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करावी. ज्या ठिकाणी स्टाईल फरशी बसवण्यात आली आहे, त्या जागी शहाबादी फरशी किंवा गट्टू बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, न. प.चे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, जीवन प्राधिकरणचे अधिकारी व न. प. चे अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री घेणार आढावा बैठक

काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील विविध विकासकामांच्या संदर्भात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानुसार मंत्री एकनाथ शिंदे हे १६ जानेवारी रोजी बीड शहरात येत असून बीडमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजना, अमृत अटल योजना, रस्ते विकासाची कामे व नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भात ते आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे.

Web Title: 129 crore work proposal submitted to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.