११५ ‘गोंधळीं’वर पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:34 IST2019-03-23T00:33:57+5:302019-03-23T00:34:13+5:30
२०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे.

११५ ‘गोंधळीं’वर पोलिसांचा ‘वॉच’
बीड : २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया तर केल्या जाणारच आहेत, शिवाय ते पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.
मागील वेळेसच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गोंधळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र तरीही काही उपद्रवींनी आचारसंहितेचा भंग करण्याबरोबरच इतर कारनामे केले. त्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. याच गुन्हेगारांचा पुन्हा बायोडाटा काढणे सुरू केले आहे. बीड पोलिसांनी याची माहिती घेतली असता जिल्ह्यात निवडणूक काळात तब्बल ४१ गुन्हे दाखल झाले असून ११५ आरोपी आहेत. यामध्ये लोकसभेचे २४ गुन्हे आणि ६९ आरोपी तर विधानसभेचे १७ गुन्हे आणि ८६ आरोपी आहेत.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी नियोजन केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सांगितले. यासाठी विशेष पथकेही नियुक्त केल्याचे पाळवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
किरकोळ वाद आले अंगलट
कट्टर समर्थक म्हणून नेत्याला दाखविण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. मात्र हाच उत्साह कार्यकर्त्यांच्या अंगलट येतो. काही तरी अनुचित प्रकार घडतो आणि पोलीस दप्तरी नावाची नोंद होते. त्यानंतर वारंवार न्यायालय आणि निवडणूक काळांत पोलीस ठाण्यांचे उंबरे झिजवावे लागतात. निवडणूक काळात किरकोळ वादच कार्यकर्त्यांच्या अंगलट येत असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे.
यांनी केले गंभीर गुन्हे
निवडणूक काळात शारीरिक इजा करणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. गंभीर आणि दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची संख्या ४०८ आहे.
त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे विशेष शाखेचे पो.नि. हेमंत मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.