गर्भवतींसाठी देवदूत ठरली १०८ सेवा; ४१ हजार बाळंतीणींनी रुग्णवाहिकेतच दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:48 IST2025-07-15T15:47:54+5:302025-07-15T15:48:34+5:30
१०८ क्रमांकाची मोफत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा; १७ लाख गर्भवतींना पोहोचविले सुखरूप रुग्णालयात

गर्भवतींसाठी देवदूत ठरली १०८ सेवा; ४१ हजार बाळंतीणींनी रुग्णवाहिकेतच दिला जन्म
- सोमनाथ खताळ
बीड : महाराष्ट्र शासनाने २०१४ पासून १०८ क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध असते. २०१४ ते जून २०२५पर्यंत या सेवेचा १ कोटी १० लाख ८१ हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. यातील १७ लाख ५४ हजार गर्भवतींना या जीवनवाहिनेने सुखरूप रुग्णालयात पोहोचविले, तर ४१ हजार महिलांनी रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला. या सेवेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात आले. एकूणच राज्याची ही आकडेवारी मदतीसोबतच आरोग्य विभागातील वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे.
१०८ रुग्णवाहिका सेवा प्रकार
१०८ रुग्णवाहिकांद्वारे अपघात, हल्ला, भाजणे, हृदयविकार, विषबाधा, प्रसूती, वीज अपघात आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन सेवा दिल्या जातात.
९३७ रुग्णवाहिका
राज्यात १०८ च्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. यात आधुनिक लाइफ सपोर्टच्या २३३ आणि बेसिक लाइफ सपोर्टच्या ७०४ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका २४ तास सामान्यांच्या सेवेसाठी धावत असतात.
सेवेचे उद्दिष्ट आणि संपर्क
गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देणे हे या सेवेचे मुख्य ध्येय आहे. सर्वाधिक कॉल हे अपघातानंतरच्या मदतीसाठी येतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी टोल फ्री १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क साधताच तातडीने डॉक्टरसह रुग्णवाहिका उपलब्ध होते.
सर्वाधिक कॉल हे अपघातानंतर
१०८ वर कॉल येताच आमच्या रुग्णवाहिका मदतीसाठी धावतात. सर्वाधिक कॉल हे अपघातानंतरच्या मदतीसाठी येतात. प्रत्येक रुग्णाला जीवदान मिळावे, हाच उद्देश ठेऊन सेवा देत असतो.
-अविनाश राठोड, समन्वयक, १०८ रुग्णवाहिका
सेवेचा प्रकार - रुग्णसंख्या
वाहन अपघात - ५,३९,८८५
हल्ला - ९३,४५७
भाजलेले/जळालेले - ३१,१३९
हृदयविकार - ९४,८०३
पडलेले/घसरलेले - १,५९,४९७
विषबाधा - २,५६,४३६
प्रसूती/गर्भधारणा - १७,५४,३७२
वीज अपघात - ७,२६८
वैद्यकीय - ६८,१९,४५१
इतर - ९,६२,०१४
गंभीर/बहु-दुखापत - ३,५४,९४३
आत्महत्या/स्वतःहून करून घेतलेली दुखापत - ८,०३८
लाभ दिलेले रुग्ण - १,१०,८१,३०३
विशेष सेवा
रुग्णवाहिकेत झालेली प्रसूती - ४१,१३७
व्हेंटिलेटरवर व्यवस्थापित केलेले रुग्ण - ४२५७