केसांमध्ये डॅंड्रफ होण्याची म्हणजेच कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात केसांची पुरेशी काळजी घेण्यासाठी लोकांना वेळ मिळत नसल्याने ही समस्या होतेच. पण या समस्येची फार काळजी करण्याची गरज नाही. कमी वेळेत आणि सोप्या घरगुती उपायांनी ही समस्या दूर केली जाऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय टोमॅटो मानला जातो. टोमॅटोचा रस केसांना लावून तुम्ही कोंड्यापासून मुक्ती मिळवू शकता.
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन असतात. टोमॅटो खाल्ल्याने आरोग्य तर चांगलं राहतंच, सोबतच त्वचेलाही याने फायदे होतात. इतकेच नाही तर टोमॅटोचा रस केसांना लावल्यास केसातील कोंडा दूर होतो आणि केस चमकदार होतात.
जाणून घ्या फायदे
१) टोमॅटोचा रस केसांना लावल्यास केसांचं टेक्चर मुलायम होतं आणि केसांची शायनिंगही वाढते.
२) टोमॅटोच्या रसाने केसांमध्ये पीएच लेव्हलही बॅलन्स होतं. ज्यामुळे रखरखीत आणि निर्जीव केसांमध्येही जीव येतो.
३) टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे या रसाने केसांना मजबूती मिळते.
४) टोमॅटोला रसाने केसांना मजबूती मिळते आणि केसांना दोन तोंडे फुटत नाही. सोबतच केसांची वाढही चांगली होती.
कोंड्यासाठी
केस फार ड्राय झाले असतील आणि कोंडाही भरपूर झाला असेल तर टोमॅटो रसात मध मिश्रित करून केसांना लावा. अर्धा तास हा हेअर मास्क केसांना लावून ठेवा आणि नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा. हा हेअर मास्क केसांना लावल्यावर लगेच हलकी जळजळ किंवा खाज येईल, पण याने घाबरू नका. असं टोमॅटोतील अॅसिड प्रॉपर्टीमुळे होतं.
डोक्याच्या त्वचेवर खास असेल तर
टोमॅटोच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवरील खाज आणि कोंड्याची समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी तीन टोमॅटोंचा रस घ्या त्यात २ चमचे लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. ३० मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा. यावेळी शॅम्पूचा वापर करण्याची गरज नाही.
दाट केसांसाठी
दाट केस मिळवण्यासाठी २ चमचे कॅस्टर ऑइल आणि १ टोमॅटोचा रस मिश्रित करून पेस्ट तयार करा. आता हे पेस्ट हलकी गरम करा आणि डोक्याच्या त्वचेवर लावा. पेस्ट जास्त गरम करू नका. पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावल्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि १ ते २ तास लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही वापरता त्या शॅम्पूने केस धुवा.
(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे माहितीसाठी देण्यात आले असून हे घरगुती उपाय आहे. वरील उपायांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण काही लोकांना टोमॅटोच्या रसाची अॅलर्जीही असू शकते.)