लिंबाचा अर्क ठरू शकतो मुतखड्यावर वरदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:03 IST
वेदनादायक मुतखड्याची वृद्धी थांबविण्यात आणि त्याचे क्रिस्टल्स विरघळवण्यात लिंबूवर्गीय फळांचा अर्क अत्यंत लाभदायक असतो.
लिंबाचा अर्क ठरू शकतो मुतखड्यावर वरदान
संशोधकांच्या एका गटाने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, मुतखड्यावर उपचार करण्यामध्ये लिंबूवर्गीय फळांचा अर्क प्रभावी ठरू शकतो. वेदनादायक मुतखड्याची वृद्धी थांबविण्यात आणि त्याचे क्रिस्टल्स विरघळवण्यात लिंबूवर्गीय फळांचा अर्क अत्यंत लाभदायक असतो.मुतखड्यात आढळणारे कॅल्शिअम आॅक्सालेट क्रिस्टल्स हायड्रोक्सिसायट्रेटमध्ये (एचसीए) विरघळतात. त्यामुळे त्याचा वापर करून मुतखड्यावर प्रभावी औषध तयार केले जाऊ शकते असा दावा या संशोधकांनी केला आहे. ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात सांगण्यात आले की, एचसीएमुळे मुतखड्याला आळा घालणारी प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वरील निष्कर्ष विविध प्रायोगिक, संगणकीय आणि मानवी अध्ययनांचा एकत्रित अभ्यास करून काढण्यात आल्याची माहिती प्रमुख संशोधक आणि ह्युस्टन विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक जेफरी रायमर यांनी दिली. मुतखडा म्हणजे किडनीमध्ये साचलेले मिनरल्सचे सुक्ष्म व कठिण स्फटिक़ उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यामुळेदेखील मुतखडा होण्याची शक्यता वाढते.मुतखडा होऊ न देण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये गेल्या तीन दशकांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. मुतखड्याची शक्यता असलेल्या रुग्णांना अधिकाधिक पाणी पिण्याचा आणि मोठ्या प्रमाणात आॅक्सालेट असलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला देण्यात येतो.