डोळे सोडा 'हे' उपाय कराल तर तुमच्या पापण्यांच्या प्रेमातही पडतील बघणारे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:03 IST2019-11-18T11:58:20+5:302019-11-18T12:03:16+5:30
कुणाचंही सौंदर्य वाढवण्यात डोळ्यांची महत्वाची भूमिका असते. खासकरून महिलांबाबत हे अधिक बघायला मिळतं. त्यामुळेच डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यावरही महिला अधिक वेळ घेतात.

डोळे सोडा 'हे' उपाय कराल तर तुमच्या पापण्यांच्या प्रेमातही पडतील बघणारे!
(Image Credit : discovermagazine.com)
कुणाचंही सौंदर्य वाढवण्यात डोळ्यांची महत्वाची भूमिका असते. खासकरून महिलांबाबत हे अधिक बघायला मिळतं. त्यामुळेच डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यावरही महिला अधिक वेळ घेतात. अनेकांना डोळ्यांच्या पापणीचे केस म्हणजेच आयलॅशेज आकर्षक करायचे असतात. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत.
मोठे दिसतात डोळे
ज्या लोकांचे आयलॅशेज मोठे आणि दाट असतात, त्यांच्या डोळ्यांची सुंदरता दुप्पट वाढते. अनेकांच्या पापण्यांचे केस नैसर्गिकपणेच दाट आणि सुंदर असतात. पण ज्यांच्याबाबत असं नाहीये, ते काही टिप्स वापरून आणि काळजी घेऊन डोळे आणखी सुंदर करू शकतात.
व्हिटॅमिन ई
जर तुम्ही डाएटमधे व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्सचा समावेश कराल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल घेऊ शकता. याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसेच पापण्यांवर तेलही लावा.
पापण्यांना आहे याची गरज
आपल्या पापण्याच्या केसांना मस्कारा ब्रश किंवा आयब्रशच्या मदतीने रात्री झोपण्यापूर्वी खोबऱ्याचं तेल, एरंडीचं तेल लावा. असं दिवसातून किमान एकदा नक्की करा. काही दिवसांनी तुम्हाला पापण्याचे केस वाढलेले दिसतील.
ग्रीन टी
ग्रीन टी केवळ बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करत नाही तर याने आयलॅशेजची ग्रोथही होते. यासाठी ग्रीन टी ची बॅग साधारण १५ मिनिटांसाठी पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर हे पाणी पापण्यांच्या केसांना लावा. पापण्यांची हलक्या हाताने मसाज करा. नंतर ३० मिनिटांसाठी बॅग डोळ्यांवर ठेवा. दोन्ही उपायांनी तुम्हाला फायदा होईल.
पेट्रोलियम जेली
एखाद्या जुन्या मस्कारा ब्रशने तुम्ही पेट्रोलियम जेली पापण्यांच्या केसांवर लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. काही दिवसात तुम्हाला याचा फायदा बघायला मिळेल.
(टिप : वरील लेखातील उपाय हे घरगुती असून ते तुमच्या माहितीसाठी देण्यात आले आहेत. तुम्हाला हे उपाय करायचे असतील तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही प्रत्येकालाच हे उपाय लागू पडतील असंं नाही.)