हिवाळ्यात कोरड्या त्वचेला म्हणा बाय; वापरा केळ्याचे फेसपॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:50 IST2019-10-14T15:47:12+5:302019-10-14T15:50:51+5:30
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा फार कोरडी होते. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशावेळी बाजारात मिळणारं मॉयश्चरायझर क्रिम त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे दूर करत नाही.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला म्हणा बाय; वापरा केळ्याचे फेसपॅक
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा फार कोरडी होते. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशावेळी बाजारात मिळणारं मॉयश्चरायझर क्रिम त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे दूर करत नाही. या वातावरणात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी एक्स्ट्रा केअरची आवश्यकता असते.
आज आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. तसेच त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्याही कमी होतील. जाणून घेऊया हिवाळ्यात फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती फेसपॅकबाबत...
केळी आणि लोण्याचा फेसपॅक
साहित्य :
- 1 पिकलेलं केळं
- 2 चमचे लोणी किंवा मीठ नसलेलं बटर
तयार करण्याची पद्धत :
- सर्वात आधी एक पिकलेल्या केळ्याची साल काढून स्मॅश करून त्यामध्ये लोणी एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा. तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ करा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट दिसू लागेल.
केळी, दूध आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा फेसपॅक
साहित्य :
- एक पिकलेलं केळं
- 2 चमचे कच्चं दूध
- गुलाबाच्या पाकळ्या
तयार करण्याची पद्धत :
पिकलेल्या केळ्याची साल काढून त्यामध्ये 2 चमचे कच्चं दूध आणि गुलाबाच्या काही पाकळ्या एकत्र करून पेस्ट तयार करा. आता तयार पेस्ट एका भांड्यात ठेवा. त्यानंतर कॉटनच्या मदतीने ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवून चेहरा पाण्याच्या मदतीने धुवून टाका. त्यानंतर चेहऱ्यावर मॉयश्चरायझर लावा.
केळी आणि व्हिटॅमिन ई फेसपॅक
साहित्य :
- एक पिकलेलं केळं
- एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल
- एक चमचा मध
तयार करण्याची पद्धत :
एक पिकलेलं केळ व्यवस्थित स्मॅश करून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल खोला आणि एक ते दोन थेंब ऑलिव्ह ऑइल व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर यामध्ये मध एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
केळी, दही आणि मधाचा फेसपॅक
साहित्य :
- एक पिकलेलं केळं
- 2 चमचे दही
तयार करण्याची पद्धत :
एका स्वच्छ कटोरीमध्ये एक पिकलेलं केळ स्मॅश करून घ्या. आता यामध्ये 2 चमचे दही आणि मध एकत्र करा. त्यानंतर हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावा. हे लावून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)