World Championship Badminton: पी. व्ही. सिंधूला खुणावतोय हा विक्रम, पण ओकुहाराचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 19:46 IST2018-07-29T19:46:22+5:302018-07-29T19:46:56+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू अंतिम लढतीत सातत्याने येणारे अपयश विसरून पुन्हा नव्या जोमाने सज्ज झाली आहे.

World Championship Badminton: पी. व्ही. सिंधूला खुणावतोय हा विक्रम, पण ओकुहाराचा अडथळा
नँजिंग (चीन) - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू अंतिम लढतीत सातत्याने येणारे अपयश विसरून पुन्हा नव्या जोमाने सज्ज झाली आहे. सोमवारपासून सुरू होणा-या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू पदकाचा रंग बदलण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तिने 2013 व 2014 मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक, तर गतवर्षी तिने रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे तिला यंदा सुवर्णपदक खुणावत आहे.
गतवर्षी ग्लाजगोत झालेल्या स्पर्धेची अंतिम लढत ऐतिहासिक ठरली होती. जपानच्या नोझोमी ओकुहाराने 110 मिनिटांच्या संघर्षानंतर सिंधूला हार मानण्यास भाग पाडले होते. या स्पर्धेत भारताच्या एकाही खेळाडूला सुवर्णपदक जिंकता आलेले नाही त्यामुळे सिंधूकडून विक्रमी कामगिरीचा अपेक्षा आहे. गतवर्षी झालेल्या 23 वर्षीय सिंधूने सहा स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापैकी इंडिया ओपन, कोरिया ओपन आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यात तिला यश मिळाले, तर जागतिक, दुबई सुपर सीरिज आणि हाँगकाँग स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यंदाच्या हंगामात तिने इंडिया ओपन, राष्ट्रकुल आणि थायलंड ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला होता, परंतु तिला जेतेपद पटकावण्यात अपयश आले. जागतिक स्पर्धेत सिंधूला तिस-या स्पर्धेत कोरियाच्या सुंग जी ह्यूचा आणि उपांत्यपूर्व फेरीत तिला गतविजेत्या ओकुहाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बॅडमिंटन चाहत्यांना चुरशीच्या खेळाचा आस्वाद घेता येणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावणारी सायना नेहवालही सुवर्णपदकासाठी आतुर आहे. तिने 2015 व 2017 मध्ये जागतिक स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. पुरूष एकेरीत किदम्बी श्रीकांत व एच एस प्रणॉय यांच्यावर प्रमुख मदार असणार आहे.
Badminton is... TOTAL BWF World Championships 2018 #TOTALBADMINTON#TOTALBWFWC2018pic.twitter.com/hy4d2HPXlU
— BWF (@bwfmedia) July 29, 2018