निराश खेळाडूंची समजूत काढताना काऊन्सिलर झाल्यासारखे वाटते, बॅडमिंटन प्रशिक्षक संजय मिश्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 01:23 IST2020-05-10T01:22:14+5:302020-05-10T01:23:01+5:30
लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे.

निराश खेळाडूंची समजूत काढताना काऊन्सिलर झाल्यासारखे वाटते, बॅडमिंटन प्रशिक्षक संजय मिश्रा
नवी दिल्ली - कोविड-१९ महामारीतून सावरण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, या खेळाडूंची समज काढताना असे वाटत आहे की, प्रशिक्षकांपेक्षा मी काऊन्सिलर अधिक झालो आहे.
भारतात कोरोना व्हायरस महामारीमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने दोन हजारांच्या आकडा ओलांडला आहे तर ५९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना याची लागण झाली आहे. महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मिश्रा म्हणाले, ‘जवजवळ दोन महिन्यांपासून युवा खेळाडू घरीच आहेत. आता लॉकडाऊन शब्दामुळेही त्यांच्यात चीड निर्माण होते आणि ते निराशही होतात.’ भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक म्हणून २०१७ पासून जुळलेले मिश्रा म्हणाले, ‘मी त्यांना समजावतो की हे केवळ तुमच्यासोबतच नाही तर पूर्ण जगासोबत घडत आहे. त्याचसोबत त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर होण्याचा सल्ला देतो.’ मिश्रा म्हणाले, ‘मी खेळाडूंना नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा सल्ला देतो. त्यामुळे चुरशीच्या लढतीत त्यांच्यामध्ये मानसिक कणखरता निर्माण होईल. मी त्यांना महत्त्वाच्या लढतीदरम्यान मोक्याच्या क्षणी गुण गमाविल्यामुळे निराश झाल्याच्या किंवा चीड निर्माण झाल्याच्या क्षणांची आठवण करण्यास सांगतो. माझा प्रयत्न असतो की त्यांनी नकारात्मक विचारांचा उपयोग मानसिक कमकुवतपणा दूर करण्यासाठी करायला हवा.’ मी खेळाडूंना समजावले की घरीच बॅडमिंटन कोर्टप्रमाणे जेवढे शक्य होईल तेवढा सराव सुरू ठेवा व फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यामुळे पुनरागमन करताना अडचण भासणार नाही. (वृत्तसंस्था)