जगातील बडी EV कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याच्या तयारीत; टाटा मोटर्सशीही बोलणी सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:11 IST2025-02-20T13:10:58+5:302025-02-20T13:11:30+5:30
चीनमधून कार भारतात विकायच्या होत्या. परंतू, गेल्या काही वर्षांपासून टेस्लाने खूप प्रयत्न करूनही ते शक्य झाले नव्हते.

जगातील बडी EV कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याच्या तयारीत; टाटा मोटर्सशीही बोलणी सुरु...
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतताच एलन मस्क यांनी भारतात टेस्लाच्या कार लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. दिल्ली आणि मुंबईत कर्मचारी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून टेस्ला कार बनविण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी जागेच्या शोधात आहे. यासाठी टेस्लाने महाराष्ट्रात चाचपणी सुरु केली असून टाटा मोटर्स सोबत भागीदारी करण्याचीही चाचपणी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार टेस्ला पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्रकल्पात गाड्या बनविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी टेस्लाने टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
टेस्लासाठी महाराष्ट्र ही पहिली पसंत असणार आहे. भारताने टेस्लाला देशातच प्रकल्प उभारण्याची ताकीद दिली होती. टेस्लाला चीनमधून कार भारतात विकायच्या होत्या. परंतू, गेल्या काही वर्षांपासून टेस्लाने खूप प्रयत्न करूनही ते शक्य झाले नव्हते. अखेर टेस्लाने भारतात कारखाना टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात मोठी ऑटो इंडस्ट्री आहे. पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरात ही ऑटो इंडस्ट्री पसरलेली आहे. जनरल मोटर्सचा प्लाँटही आता ह्युंदाईने घेतला आहे. टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन, बजाज ऑटोसह मर्सिडीज बेंझही या भागात आहे. यामुळे टेस्लाला हवे असलेले पार्ट्स या भागातून बनवून मिळण्याची मोठी शक्यता आहे. याच कारणाने टेस्लाने महाराष्ट्राला पहिली पसंती दिली आहे.
महाराष्ट्राला टेस्ला सारखी कंपनी राज्याबाहेर जाणे परवडणारे नाही. कारण यापूर्वीच टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन सारखे बडे प्रकल्प राज्याबाहेर नेण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्राला टेस्लासाठी चांगल्या सोई, दळणवळणाच्या सोई उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. चाकण परिसरात होत असलेली वाहतूक कोंडी, यामुळे कंपन्या त्रस्त झालेल्या आहेत. यामुळे टेस्लाला कुठे जागा मिळते की टाटा मोटर्स राजी होते, हे पाहणे भविष्यात औत्सुक्याचे ठरणार आहे.