बीजिंग: भविष्यातील वाहतूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या उडणाऱ्या कार (फ्लाइंग कार) च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चीनमध्ये एका सार्वजनिक उड्डाण चाचणीच्या रिहर्सलदरम्यान दोन 'XPeng AeroHT' कंपनीच्या eVTOL फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात एक कार खाली कोसळून तिला आग लागली तर दुसरी सुखरूप खाली उतरली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनमध्ये एका हवाई प्रदर्शनाच्या तयारीदरम्यान घडली. रिहर्सल सुरू असताना दोन फ्लाइंग कार एकमेकांच्या खूप जवळ आल्या आणि त्यांची धडक झाली. धडकेनंतर सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असलेली एक कार जमिनीवर कोसळली आणि तिच्यातून धूर निघू लागला. सुदैवाने, दुसऱ्या कारच्या वैमानिकाने त्याची कार सुरक्षितपणे खाली उतरवली.
या अपघातामुळे फ्लाइंग कारच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की अपघात झाला त्यावेळी गाड्या मॅन्युअल मोडमध्ये होत्या की ऑटोमॅटिक मोडमध्ये. उडणाऱ्या कारच्या इतिहासातील हा पहिला मोठा अपघात मानला जात आहे, ज्यामुळे या तंत्रज्ञानाच्या तांत्रिक सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.