फोक्सवॅगन इंडियाने एप्रिलमध्ये त्यांची फ्लॅगशिप एसयूव्ही टिगुआन आर- लाइन लाँच केली. ही कार बाजारात दाखल होऊन तीन महिने उलटले नाही, तोच काही डिलर्स या कारच्या खरेदीवर ३ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत. त्यामुळे फोक्सवॅगनची टिगुआर आर-लाइन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.
भारतात फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइनची एक्स-शोरूम किंमत ४९ लाख रुपये आहे. भारतात लॉन्च झाल्यापासून अवघ्या अडीच महिन्यांतच काही फोक्सवॅगन डीलरशिप या कारच्या खरेदीवर ३ लाखांपर्यंत सूट देत आहेत. फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइननंतर कंपनीने गोल्फ जीटीआय लॉन्च केली. भारतात या कारला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे कदाचित भारतातील अनेक डीलर्सने एसयूव्ही टिगुआन आर- लाइनच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन कार स्वस्तात खरेदी करण्याची ग्राहकांकडे संधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवर एकूण ३ लाख रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यात २ लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि एक लाखांपर्यंत इतर फायदे मिळत आहेत. कारच्या किंमतीत घट झाल्याने विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.