फॉक्सवॅगनच्या गाड्यांना आग लागू शकते, कंपनीने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:23 IST2022-04-01T14:22:35+5:302022-04-01T14:23:11+5:30
Volkswagen : फॉक्सवॅगनची सब्सिडियरी ब्रँड ऑडीच्या जवळपास 24,400 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. स्कोडा आणि सीट वाहनेही या रिकॉलच्या कक्षेत आली आहेत.

फॉक्सवॅगनच्या गाड्यांना आग लागू शकते, कंपनीने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या
नवी दिल्ली : फॉक्सवॅगन ग्रुपने (Volkswagen Group) जगभरात विकल्या गेलेल्या 1 लाखाहून अधिक प्लग-इन हायब्रिड गाड्या परत मागवल्या आहेत. कारण या सर्व गाड्यांना आग लागण्याचा धोका होता. कंपनीने सांगितले की, फॉक्सवॅगन पसाट, गोल्फ, टिगुन आणि आर्टिओनच्या सुमारे 42,300 ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे, याशिवाय फॉक्सवॅगनची सब्सिडियरी ब्रँड ऑडीच्या जवळपास 24,400 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. स्कोडा आणि सीट वाहनेही या रिकॉलच्या कक्षेत आली आहेत.
फॉक्सवॅगनच्या म्हणण्यानुसार, इंटरनल कंबन्शन इंजिनला इलेक्ट्रिक ड्राइव्हशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानातील त्रुटीमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. 1 लाख वाहने परत मागवल्याबद्दल, फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इंधनावर चालणारे इंजिन आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हला जोडणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये काही समस्या आहेत. यामुळे, इन्सुलेटेड हाय व्होल्टेज बॅटरी कारमध्ये शॉर्ट सर्किट करू शकते, ज्यामुळे कारला आग लागण्याचा धोका निर्माण होतो.
जर्मनीमध्ये अशाप्रकारची 16 प्रकरणे समोर
जर्मनीचे एक वृत्तपत्र रेग्युलेटर केबीएच्या आधारावर फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इंजिन डिझाइन कव्हर योग्यरित्या पॅक केलेले नसू शकते, ज्यामुळे गरम हवेच्या संपर्कात आल्यावर कारला आग लागू शकते," या वृत्तपत्रात असेही म्हटले आहे की, जर्मनीमध्ये अशी 16 प्रकरणे समोर आली आहेत.रिकॉलमुळे फॉक्सवॅगन ग्रुपच्या गाड्यांव्यतिरिक्त ऑडी, सीट आणि स्कोडा या गाड्यांवरही परिणाम होईल.
फॉक्सवॅगन वर्टसची बुकिंग सुरु
भारतीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात सातत्याने आपली अनेक नवीन वाहने लॉन्च केली आहेत. कंपनीची आगामी कार फॉक्सवॅगन वर्टस आहे, ज्याची प्री-बुकिंग भारतात सुरू झाली आहे. ज्यांना कार खरेदी करण्याची इच्छा आहे, ते 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह सेडान बुक करू शकतात. कंपनीने भारतात या कारचे उत्पादनही सुरू केले आहे.