नवी दिल्ली - भारतातीलवाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेले एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार टेस्ला आणि वियतनामी कार उत्पादन कंपनी विनफास्ट भारतात एन्ट्री घेत आहेत. जगातील तिसऱ्या कार बाजारात टेस्ला त्यांचे पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू करत आहे. दुसरीकडे वियतनामी कंपनी विनफास्ट भारतात त्यांच्या प्रवासाला सुरुवात करत इलेक्ट्रिक एसयूवी मॉडेलचे अधिकृत बुकींग सुरू करणार आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या जमिनीवर अमेरिका आणि व्हिएतनाममधील दिग्गज कंपन्या एकाच दिवशी आमनेसामने आल्या आहेत. एकीकडे टेस्ला कंपनी सर्वात मोठी कार उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे तर विनफास्ट वेगाने उभी राहणारी वाहन उत्पादन कंपनी आहे. टेस्ला आज भारतातील पहिले शोरूम सुरू करत आहे. तर विनफास्ट यात पुढे गेली आहे. विनफास्ट याआधीच देशातील २७ शहरांत ३२ पार्टनरशिप दिली आहे. विनफास्ट आजपासून त्यांच्या कारची बुकिंग सुरू करणार आहे.
भारतीय बाजारपेठ मस्क यांच्यासाठी महत्त्वाची
सर्वात आधी टेस्लाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय बाजारपेठ एलन मस्कसाठी खूप महत्त्वाची आहे. युरोपियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACEA) च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात युरोपमध्ये टेस्लाच्या नवीन कारची विक्री सलग पाचव्या महिन्यात कमी झाली. बहुतेक ग्राहक चिनी कार कंपन्यांकडे वळत आहेत कारण त्या परवडणाऱ्या आहेत. मे महिन्यात टेस्लाच्या कारची विक्री १३,८६३ युनिट्सपर्यंत घसरली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २७.९% कमी आहे असं ACEA च्या अहवालात म्हटलं आहे. अशा परिस्थितीत एलन मस्कसाठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाची बनली आहे.
भारतात आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी मस्क यांनी इथल्या सरकारवर परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रिक कारवरील कर कमी करण्यासाठी दबाव आणला. सुरुवातीला टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारण्याची चर्चा देखील होती परंतु त्यात यश आले नाही. टेस्ला बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. भारत सरकारच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे टेस्लाला निश्चितच काही दिलासा मिळाला आहे. भारत यापूर्वी CBU मार्गाने आणलेल्या वाहनांवर ११०% ची इतके आयात शुल्क लादत असे. परंतु २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ४० हजार डॉलर (सुमारे ३५ लाख) पेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वाहनांसाठी ते ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले.
नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणात ४० हजार डॉलरपेक्षा कमी किमतीच्या कारवरील सीमाशुल्कावर १५% पर्यंत सूट देखील समाविष्ट आहे. परंतु वाहन उत्पादकांना ही सूट मिळविण्यासाठी काही अटी आहेत. कार उत्पादकांना ३ वर्षांत किमान ४,१५० कोटी रुपये (सुमारे ४८६ मिलियन डॉलर्स) गुंतवणूक करावी लागेल आणि ५ वर्षांत देशांतर्गत उत्पादन सुरू करावे लागेल. या धोरणानुसार कंपन्यांना दरवर्षी ८,००० इलेक्ट्रिक वाहने आयात करण्याची परवानगी असेल आणि त्यांना कस्टम ड्युटीमध्ये सूट मिळण्याचा लाभ देखील मिळेल.
विनफास्टची तयारी काय आहे?
विनफास्टची मूळ कंपनी Vingroup ही व्हिएतनाममधील सर्वात मोठ्या उद्योगापैकी एक आहे. जी तंत्रज्ञान उद्योग, रिअल इस्टेट, रिटेल आणि आरोग्यसेवा ते हॉस्पिटॅलिटी व्यवसायात एक प्रमुख नाव आहे. ही कंपनी १९९३ मध्ये फाम न्हाट वुओंग यांनी सुरू केली होती. सुरुवातीला ही कंपनी फूड प्रॉडक्ट बनवत असे. २०१७ मध्ये कंपनीने विनफास्ट नावाची इलेक्ट्रिक कार कंपनी सुरू केली. २०२१ पासून त्यांनी कारचे उत्पादन सुरू केले. जरी विनफास्ट टेस्लासोबत भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत असली तरी दोघांच्या उद्योगात खूप मोठा फरक आहे.
विनफास्टची भारतासाठी प्लॅनिंग
टेस्ला सीबीयू मार्गाने भारतात प्रवेश करत असताना विनफास्टने दुसरा मार्ग निवडला आहे. विनफास्ट भारतात कार असेंबल करेल आणि त्या येथील बाजारात विकेल. त्याचा सर्वात मोठा फायदा कारच्या किमतीवर दिसून येईल. कंपनीने भारतातील २७ प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३२ शोरूम उघडले आहेत. कंपनी त्यांच्या दोन इलेक्ट्रिक कार VF6 आणि VF7 चे अधिकृत बुकिंग सुरू करणार आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही आहेत. विनफास्टने मागील वर्षी जानेवारी महिन्यात तामिळनाडू येथे इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी उत्पादन प्लांट सुरू करण्यासाठी सरकारशी करार केला. त्यात १ लाख ६६ हजार २१ कोटी रूपये कंपनी भारतात गुंतवणूक करणार आहे.