वाहन क्षेत्रात मंदी नाही; व्यापारी संघटना CAIT चा कंपन्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:22 IST2019-09-17T16:20:57+5:302019-09-17T16:22:07+5:30
भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते.

वाहन क्षेत्रात मंदी नाही; व्यापारी संघटना CAIT चा कंपन्यांवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते. तर गडकरीनी थोडी कळ सोसा, हे ही दिवस जातील, असा सबुरीचा सल्ला दिला होता. मात्र, देशातील व्यापारी संघटना CAIT ने वाह निर्मिती कंपन्यांवरच गंभीर आरोप केला आहे.
मारुती, टाटासारख्या मोठ्या कंपन्यांना मागणी घटल्यामुळे कंपन्या काही दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागत आहेत. तसेच यामुळे कामगार कपातही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. मात्र, सीएआयटीने या कंपन्यांवरच मोठा आरोप केला असून केवळ सरकारकडून पॅकेड पदरात पाडण्यासाठीच या कंपन्या रडत असल्याचे म्हटले आहे.
जगभरात मंदीचे वातावरण आहे. जीएसटी, दुष्काळ, मजुरी आणि रोखीच्या कमतरतेमुळे वाहनांच्या विक्रीमध्ये सुस्ती आली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशातील वाहन उद्योगामध्ये मंदी नाही. ते केवळ पॅकेज मिळविण्यासाठी असे करत आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या कारना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बुकिंग पाहिल्यास कोणत्या क्षेत्रात मंदी आल्याचे वाटत नाही.
याचसोबत त्यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारा फेस्टिव्हल सेलवर तातडीने बंदी आणण्याची मागणी केली आहे. य़ा कंपन्या एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. सरकारने कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयाची पायरी चढू. या कंपन्यांना केवळ बी2बी व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र, ते मोठ्या जाहिराती अभियानामध्ये सहभागी होतात. या कंपन्या व्यापार करत नसून मुल्यांकनाचा व्यवहार करत आहेत. त्यांनी मागील 5 वर्षांतील टॉप 10 व्हेंडर्सची माहिती दिली पाहिजे. भारतात व्याजदर जास्त असून या कंपन्यांना परदेशातून कमी व्याजाने कर्ज मिळत असल्याचा आरोप केला आहे.