टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:43 IST2025-11-01T12:42:46+5:302025-11-01T12:43:32+5:30
टेस्लासारख्या कंपनीने एखाद्याला बुक करूनही सात-साडेसात वर्षे कारच डिलिव्हर केली नाही आणि पैसेही ढापले, असे जर तुम्ही वाचले तर ...

टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
टेस्लासारख्या कंपनीने एखाद्याला बुक करूनही सात-साडेसात वर्षे कारच डिलिव्हर केली नाही आणि पैसेही ढापले, असे जर तुम्ही वाचले तर तुमचा विश्वास बसणार नाही. हा प्रकार कोणा ऐऱ्यागेऱ्यासोबत घडला नाहीय, तर जगाला भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या ओपन एआयच्या सॅम अल्टमनसोबत घडला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील जागतिक कंपनी OpenAI चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. जगाला भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे अल्टमन स्वतः एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या एका जुन्या बुकिंगमुळे त्रस्त आहेत. अल्टमन यांनी तब्बल साडेसात वर्षांपूर्वी (July 2018) टेस्लाची एक बहुप्रतिक्षित कार बुक केली होती, परंतु ही कार त्यांना अद्यापही मिळालेली नाही. अखेरीस, प्रतीक्षेला कंटाळून अल्टमन यांनी आता टेस्लाकडे आपली संपूर्ण रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.
ईमेलही झाला 'बाउन्स'!
सॅम अल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला. त्यांनी 2018 मध्ये बुकिंगची पावती, रिफंडसाठी टेस्लाला पाठवलेला ईमेल आणि कंपनीच्या बाजूने आलेला 'बाउन्स बॅक' संदेश असे तीन स्क्रीनशॉट्स शेअर केले. "मी खरोखरच या कारसाठी उत्सुक होतो! आणि मला उत्पादन विलंबाची जाणीव आहे. पण साडेसात वर्षांचा हा काळ खूप जास्त वाटला.", असे अल्टमन यांनी सांगितले.
नेमके कोणते मॉडेल बुक केले होते?
अल्टमन यांनी नेमके कोणते मॉडेल बुक केले होते हे स्पष्ट नाही, पण 2018 मधील त्यांच्या $45,000 (सुमारे ₹37 लाख) च्या प्री-रिझर्व्हेशन रकमेवरून त्यांनी बहुप्रतिक्षित टेस्ला रोडस्टर (Tesla Roadster) ही इलेक्ट्रिक सुपरकार बुक केली असावी, असा अंदाज आहे. रोडस्टरचे उत्पादन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले आहे.