अवघ्या 15 मिनिटांत कार फुल्ल चार्ज; Tesla ने 'या' शहरात सुरू केले फास्ट चार्जिंग स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:26 IST2025-12-19T13:15:31+5:302025-12-19T13:26:07+5:30
Tesla EV: भविष्यात आणखी शहरांमध्ये चार्जिंग नेटवर्क विस्तारले जाईल.

अवघ्या 15 मिनिटांत कार फुल्ल चार्ज; Tesla ने 'या' शहरात सुरू केले फास्ट चार्जिंग स्टेशन
Tesla EV: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने भारतात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी गुरुग्राममध्ये चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. अवघ्या 15 मिनिटांत कार चार्ज होऊ शकणारी फास्ट चार्जिंग सुविधा येथे उपलब्ध असेल. देशात इलेक्ट्रिक वाहन चालकांना सुलभ आणि वेगवान चार्जिंग मिळावे, या उद्देशाने टेस्ला हळूहळू भारतात आपले चार्जिंग नेटवर्क विस्तारत आहे.
DLF होरायझन सेंटरमध्ये चार्जिंग स्टेशन
गुरुग्राममधील हे चार्जिंग स्टेशन DLF होरायझन सेंटर येथे, टेस्ला सेंटर सुरू झाल्यानंतर कार्यान्वित करण्यात आले आहे. हे स्टेशन होरायझन सेंटरच्या सरफेस पार्किंग एरियामध्ये उभारण्यात आले असून, येथे ग्राहकांसाठी फास्ट आणि नॉर्मल अशा दोन्ही प्रकारच्या चार्जिंग सुविधा उपलब्ध आहेत.
चार्जिंग स्टेशनची वैशिष्ट्ये
या चार्जिंग स्टेशनवर एकूण 4 V4 सुपरचार्जर(फास्ट चार्जिंग) आणि 3 डेस्टिनेशन चार्जर(नॉर्मल चार्जिंग) बसवले आहेत.
15 मिनिटांत 275 किमीची रेंज
टेस्लाच्या माहितीनुसार, सुपरचार्जरद्वारे केवळ 15 मिनिटांत Model Y कारला सुमारे 275 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते. ही रेंज गुरुग्राम ते जयपूरसारख्या प्रवासासाठी पुरेशी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. टेस्लाचे चार्जिंग सिस्टम अत्यंत सोपे असून, प्लग अँड चार्ज या संकल्पनेवर आधारित आहे.
टेस्लाच्या या पावलामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठा वेग मिळणार आहे. मुंबई-दिल्लीसह गुरुग्राममध्ये फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू झाले असून, भविष्यात आणखी शहरांमध्ये चार्जिंग नेटवर्क विस्तारले जाण्याची अपेक्षा आहे.