Tata Vs. Maruti भिडणार; एकाच दिवशी दोन्ही कंपन्या 'या' कार लाँच करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:31 IST2019-01-21T16:30:40+5:302019-01-21T16:31:09+5:30
दोन स्पर्धक कंपन्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्याचे प्रसंग बऱ्याचदा घडलेले आहेत.

Tata Vs. Maruti भिडणार; एकाच दिवशी दोन्ही कंपन्या 'या' कार लाँच करणार
मुंबई : भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी देशाच्याच दोन कंपन्या एकमेकांना भिडणार आहेत. येत्या 23 जानेवारीला टाटा आणि मारुती या दोन्ही कंपन्या त्यांच्या कार लाँच करणार आहेत. यापैकी टाटाची कार ही नवी कोरी तर मारुतीचा कार ही सर्वात लोकप्रिय असलेली आहे. या स्पर्धेमुळे कोण भाव खाऊन जाणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.
दोन स्पर्धक कंपन्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्याचे प्रसंग बऱ्याचदा घडलेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच अॅपलने माहिती असूनही वनप्लस मोबाईलच्या 6T लाँचिंगवेळीच अॅपलच्या आयपॅडचे लाँचिंग ठेवले होते. या दोन दिग्गज कंपन्या एकमेकांसोबत उभ्या ठाकल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव निर्माण झाला होता. कोण माघार घेणार, हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. अखेर वनप्लसने एक पाऊल मागे घेत लाँचिंग सोहळा एक दिवस पुढे ढकलला होता. अशीच काहीशी परिस्थिती आज भारताच्या दोन मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये दिसत आहे.
टाटा मोटर्सने हॅरिअरच्या लाँचिंगची तारिख दोन- तीन महिन्य़ांपूर्वीच ठरविली होती. त्यानुसार प्रसिद्धीमाध्यमांद्वारे बातम्याही दिल्या जात होत्या. हॅरिअर ही एसयुव्ही प्रकारातील गाडीही इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड होत होती. मात्र, एवढे असूनही मारुतीने तिची 20 वर्षांपासून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेली कार वॅगन आरचे लाँचिंग ठेवले आहे. या दोन्ही कारची श्रेणी वेगवेगळी असली तरीही स्पर्धेमुळे कोणती कार झाकोळली जाणार आणि कोणत्या कारला झळाळी मिळणार याबाबत वाहनक्षेत्रात कमालीची उत्सुकता आहे.
टाटाच्या हॅरिअरचे लाँचिंग मुंबईमध्ये होणार असून मारुतीच्या वॅगन आरचे लाँचिंग दिल्ली येथे करण्यात येणार आहे.