टाटाने देशाचे इंधनापोटी ७ अब्ज रुपये वाचवले; तीनच ईव्ही कारनी करून दाखवले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:45 IST2023-08-16T14:45:14+5:302023-08-16T14:45:27+5:30
सध्या टाटाकडे तीनच ईव्ही कार आहेत. त्यापैकी नेक्सॉनने टाटाला ईव्ही सेगमेंटमध्ये भक्कम पाय रोवण्यास मदत केली आहे.

टाटाने देशाचे इंधनापोटी ७ अब्ज रुपये वाचवले; तीनच ईव्ही कारनी करून दाखवले...
टाटा मोटर्स आता मोठमोठाले ट्रक ते पॅसेंजर व्हेईकलमध्येही दबदबा निर्माण करून लागली आहे. याचबरोबर टाटाने ईव्ही सेगमेंटमध्ये मैलाचा दगड गाठला आहे. देशात ईलेक्ट्रीक कार चालतील का? शहरांबाहेर विजेची टंचाई, चार्जिंग स्टेशन नाहीत, चार्जिंगसाठी लागणारे तासंतास अशी अनेक आव्हाने असताना टाटाने ईव्ही कार सेगमेंटमध्ये १ लाख कार विक्रीचा टप्पा पार केला आहे.
सध्या टाटाकडे तीनच ईव्ही कार आहेत. त्यापैकी नेक्सॉनने टाटाला ईव्ही सेगमेंटमध्ये भक्कम पाय रोवण्यास मदत केली आहे. पहिल्या १० हजार इलेक्ट्रिक वाहनांपासून ते १ लाख इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतचा प्रवास टाटा मोटर्सने वेगाने पूर्ण केला आहे. ५० हजार ते १ लाख हा टप्पा तर केवळ ९ महिन्यांत पूर्ण झाला आहे.
टाटा ईव्हींनी आतापर्यंत १.४ अब्ज किलोमीटर्सचे अंतर कापले आहे. हे अंतर सूर्याला तीनदा प्रदक्षिणा करण्याएवढे प्रचंड आहे. कार्बन उत्सर्जनात २,१९,४३२ टनांनी घट झाली आहे. यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. टाटा ईव्ही वापरणाऱ्यांनी एकत्रितपणे इंधनापोटी खर्च होणारे ७ अब्ज रुपये वाचवले आहेत. टाटाने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये कर्व्ह, हॅरियर ईव्ही, सिएरा ईव्ही आणि अविन्या या भविष्यकाळातील संकल्पना आणल्या आहेत.
टाटाच्या ताफ्यात सध्या टियागो ईव्ही, टिगॉर ईव्ही आणि नेक्स़ॉन ईव्ही आहे. Tata Nexon EV ला टाटाने २०२० मध्ये लाँच केली होती. नेक्सॉन ईव्ही भारतात ५०० हून अधिक शहरात विकली जात आहे. टाटाच्या नेटवर्कचा या ईव्हीला फायदा झाला आहे. याचबरोबर टाटाने वेगवेगळ्या रेंजच्या नेक्सॉन लाँच केल्या आहेत. वाढविलेल्या रेंजचाही टाटाला फायदा होत आहे. जूनच्या अखेरीस नेक्सॉनच्या ५०००० विक्रीचा आकडा पार झाला होता.