नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा नंतर आता टाटा मोटर्सने देखील आपल्या प्रवासी वाहनाच्या किमतीत वाढ (Tata Motors Price Hike in April) केली आहे. वाहनांच्या या वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत. खर्चात वाढ झाल्यामुळे त्याचा काही बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे.
टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहनांच्या किमतीत 1.1% ने वाढ करण्यात आली आहे. नवीन किमती आज 23 एप्रिल 2022 पासून लागू झाल्या आहेत. मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार कारच्या किमतीत वेगवेगळे फरक असू शकतात. 2022 मध्ये कारच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे, तर कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी कंपनीने जानेवारी आणि मार्चमध्ये कारच्या किमती वाढवल्या आहेत.
दरम्यान, टाटा मोटर्सच्या (Tata Motors) इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. कंपनीची Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. अलीकडेच, कंपनीने चेन्नईमध्ये एकाच वेळी 101 इलेक्ट्रिक वाहनांची विक्रमी डिलिव्हरी केली आहे. यामध्ये Nexon EV व्यतिरिक्त Tigor EV चा समावेश आहे.
महिंद्राच्या सुद्धा कार महागल्याअलीकडेच महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) आपल्या कारच्या किमती 2.5% ने वाढवल्या आहेत. यानंतर कंपनीच्या कारची किंमत 10,000 रुपयांवरून 63,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. दरम्यान, या किमती विविध मॉडेलनुसार वेगवेगळ्या आहेत. महिंद्रा कंपनीच्या कारच्या वाढलेल्या किमती 14 एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.
मारुती सुझुकी इंडियानेही वाढवल्या किमतीदेशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) देखील अलीकडेच आपल्या Arena चेनमधील WagonR, Swift, Alto, S-Presso, Eeco आणि Celerio सारख्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यांच्या किमतीत 5,300 ते 10,000 रुपयांची वाढ केली आली. तर Nexa चेनवर मिळणाऱ्या गाड्यांच्या किंमतीत कमाल 11,693 रुपयांची वाढ झाली आहे.
नेक्सॉनची किंमत किती?टाटाने कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे, परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचे डिटेल्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अजून समोर आलेले नाहीत. टाटा नेक्सॉनची सर्वाधिक विक्री होणारी कार सध्या दिल्लीत 7.42 लाख ते 13.7 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत दाखवत आहे. दरम्यान, लवकरच कंपनीच्या गाड्यांच्या नवीन किमती अपडेट केल्या जातील.