Tata Motors EV: टाटा 400 किमी रेंजची इलेक्ट्रीक कार आणणार; नेक्सॉनच्या ग्राहकांची 'तक्रार' ऐकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:04 IST2021-12-27T16:04:22+5:302021-12-27T16:04:46+5:30
Tata Motors upcoming EV cars: देशात जेवढ्या इलेक्ट्रीक कार विकल्या जातात त्यामध्ये टाटा नेक्सॉनचा वाटा 60 टक्के आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 312 किमीची रेंज असली तरी या कारची प्रत्यक्षातील रेंज ही 200 किमी आहे.

Tata Motors EV: टाटा 400 किमी रेंजची इलेक्ट्रीक कार आणणार; नेक्सॉनच्या ग्राहकांची 'तक्रार' ऐकली
टाटाने इलेक्ट्रीक वाहनांसाठी नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. गेल्याच आठवड्यात टाटाने 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे सांगत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही कंपनी स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. ही कंपनी टाटा मोटर्सच्याच अधिपत्याखाली असणार असून ईव्हींचे सर्वकाही ही कंपनी पाहणार आहे. ही कंपनी स्थापन होताच टाटाने 400 किमी रेंजची ईव्ही लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. (Tata Nexon EV Facelift with more range, battery.)
टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) ही देशातील सर्वाधिक खपली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे. टाटा मोटर्स Nexon EV च्या अपडेटेड मॉडेलवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. ही नवीन नेक्सॉन 2022 च्या मध्यावर लाँच केली जाणार आहे. ही नेक्सॉन मोठ्या बॅटरी आणि मोठ्या रेंजसह येणार आहे. लांबचे अंतर कापण्यासाठी 40kWh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
देशात जेवढ्या इलेक्ट्रीक कार विकल्या जातात त्यामध्ये टाटा नेक्सॉनचा वाटा 60 टक्के आहे. या कारची रेंज वाढली तर विक्रीदेखील वाढणार आहे. सध्या नेक्स़ॉन ईव्हीमध्ये सर्वात छोटी 30.2kWh ची बॅटरी मिळते. भारतात उपलब्ध असलेल्या कारमध्ये ही स्वस्त कार आहे. यानंतर टाटाचीच टिगॉर ही कॉम्पॅक्ट सेदान ईव्हीमध्ये येते. नेक्सॉन 312 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीने केलेला आहे. तर प्रत्यक्षात रस्त्यावर कार 200 किमीचीच रेंज देते.
रिपोर्टनुसार टाटाने नेक्सॉन इव्हीच्या मालकांकडून फिडबॅक घेतला आहे. त्यांनी जास्त रेंज मिळाली तर दूरच्या प्रवासाला कार नेता येईल असे कंपनीला कळविले आहे. सध्या ईव्ही शहरांमध्येच वापरली जाते. यामुळे टाटा जास्त रेंजची कार लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.