टेस्लाच्या कार अपल्या फीचर्सच्या जोरावर, जगभरातील कार प्रेमींच्या मनावर राज्य करतात. या कारची भारतातही गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. मात्र, आता टेस्लाच्या कार लवकरच भारतातील रस्त्यांवर धावताना दिसू शकतात. कारण, भारतात एप्रिल महिन्यापर्यंत टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) आपला रिटेल उद्योग सुरू करण्याचा प्लॅन आखत आहेत. टेस्लाकडून सुरुवातीला इलेक्ट्रिक कार बर्लिन प्लांटमधून इम्पोर्ट करण्याचा विचार सुरू आहे.
मुंबई आणि दिल्लीत शोरूम सुरू करण्याचा प्लांट -सीएनबीसीच्या वृत्तानुसार, टेस्लाने भारतातील आपल्या शोरूमसाठी जागाही निवडली आहे. मुंबईतील बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्लीतील एरोसिटीमध्ये शोरूम उघडण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत २५,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा (सुमारे २२ लाख रुपये) कमी किमतीत इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते.
मॅन्युफॅक्चरिंगसंदर्भात अद्याप कसलीही घोषणा नाही -टेस्लाने भारतीय बाजारपेठेत कार निर्मितीसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. तथापी, भारतीय OEM पुरवठादारांकडून स्पेअरपार्ट खरेदी करण्यासंदर्भात कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. एवढेच नाही, तर 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ला भारतीय सप्लायर्सकडून 1 बिलियन डॉलरहून अधिकचे (जवळपास 8,300 कोटी रुपये) सोर्सिंग करू शकते, असा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे.
भारताच्या दौऱ्यावर येऊ शकतात इलॉन मस्क -या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांच्यासोबत इलॉन मस्क देखील येऊ शकतात, असा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, टेस्लाने भारतात भरती देखील सुरू केली आहे. यासंदर्भात लिंक्डइनवर १३ जॉब ओपनिंग पोस्ट करण्यात आली आहे. खरे तर, पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्या गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीनंतर, या सर्व घडामोडी घडत आहेत.