SUV in Demand: हॅचबॅक, सेदान कारचे दिवस सरले; आता या सेगमेंटचे देशात वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 20:12 IST2021-10-20T20:10:35+5:302021-10-20T20:12:58+5:30
SUV sale grow: गेल्या महिन्यात तर जेवढ्या हॅचबॅक आणि सेदान कार मिळून विकल्या गेल्या त्यापेक्षा जास्त कार या एसयुव्ही विकल्या गेल्या आहेत. एसयुव्हीची क्रेझ एवढी वाढली की मार्केट शेअर 40 टक्क्यांवर गेला आहे.

SUV in Demand: हॅचबॅक, सेदान कारचे दिवस सरले; आता या सेगमेंटचे देशात वारे
देशात सध्या कार बाजार कात टाकत आहे. कारण ग्राहकांचा मूड बदलू लागला आहे. आधी हॅचबॅक, नंतर सेदान, कॉम्पॅक्ट हॅचबॅकचे दिवस होते. या प्रकारातील कार धडाधड विकल्या जात होत्या. परंतू गेल्या काही महिन्यांपासून SUV आणि कॉम्पॅक्ट SUV ना ग्राहक पसंती देऊ लागले आहेत. यामुळे हॅचबॅक, सेदान कडे ग्राहक ढुंकूनही पाहत नाहीए.
गेल्या पाच वर्षांत भारतीय बाजारात एसयुव्हीचा बोलबाला वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात तर जेवढ्या हॅचबॅक आणि सेदान कार मिळून विकल्या गेल्या त्यापेक्षा जास्त कार या एसयुव्ही विकल्या गेल्या आहेत. एसयुव्हीची क्रेझ एवढी वाढली की मार्केट शेअर 40 टक्क्यांवर गेला आहे.
यावेळच्या सणासुदीच्या सिझनमध्ये बाजारात नवनवीन एसयुव्ही आल्या आहेत. निस्सान, रेनो, ह्युंदाई, किया, एमजी, टाटा सारख्या कंपन्यांनी ऑटोमोबाइल सेक्टरला मोठी संजिवनी दिली आहे. कार बाजारात केवळ SUVs ने हिस्सा वाढविलेला नाही, परंतू इतर सेगमेंटपेक्षा या सेगमेंटचा वेग खूप वेगाने आहे.
एमजीने अॅस्टर, टाटाने पंच या दोन छोट्या एसयुव्ही लाँच केल्या आहेत. अॅस्टरमध्ये वेगळी फिचर्स आणि पंचमध्ये वेगळी फिचर्स असली तरी देखील ती ग्राहकांना अपिल करणारी आहेत. महिंद्राने देखील काही आठवड्यांपूर्वी XUV700 लाँच केली आहे. या कारलाही ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे बाजारात सेदान, हॅचबॅक कमी आणि एसयुव्हींचा पर्याय जास्त अशी वेळ आली आहे.
ग्राहक का वळला...
एखाद्या ग्राहकाने काही वर्षांपूर्वी हॅचबॅक घेतली, नंतर त्याने सेदानमध्ये अपग्रेड केली. आता हा ग्राहक मायक्रो, कॉम्पॅक्ट एसयुव्हींकडे वळू लागला आहे. ज्या लोकांनी चार, पाच वर्षांपूर्वी या कॉम्पॅक्ट एसयुव्ही किंवा सेदान घेतल्यात ते आता मोठ्या एसयुव्हींकडे वळू लागले आहेत. यामुळे कंपन्यांनी या दोन प्रकारच्या ग्राहकांसमोर एसयुव्हींचे पर्याय ठेवले आहेत.