एकीकडे मारुती, टाटा, ह्युंदाई सारख्या कार कंपन्यांना विक्रीसाठी झगडावे लागत असताना स्कोडा इंडियाने भारतात कार विक्रीवरून नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. स्कोडाच्या कार या प्रिमिअम असतात. यामुळे यांच्या किंमती आणि सर्व्हिस देखील महाग असते. यामुळे जे लोक शौकीन असतात ते या कार घेतातच घेतात. आता स्कोडाला कायलॅकने मोठा बुस्ट दिला आहे.
स्कोडाने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जूनपर्यंत 36,194 गाड्या विकल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ही विक्रीतील वाढ १३४ टक्के आहे. या विक्रीमुळे स्कोडाने देशातील टॉपच्या पहिल्या सात कंपन्यांमध्ये एन्ट्री केली आहे.
कायलॅक एसयुव्हीमुळे स्कोडाला हे करणे शक्य झाले आहे. स्कोडाकडे असलेली सेदान कार स्लाव्हियाने देखील चांगली विक्री नोंदविली आहे. स्कोडाला भारतात येऊन आता २५ वर्षे झाली आहेत. यंदा स्कोडाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तसेच स्कोडाची १३० वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ ठेवण्यात आली होती. एवढ्या जुन्या कंपनीने भारतात गेल्या पंचवीस वर्षांत मजबूत पाय रोवले आहेत.
स्कोडासाठी भारतीय बाजारातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे २०२४ मध्ये स्कोडाने आपले रँकिंग सुधारले आहे. स्कोडाच्या रँकिंगमध्ये चार स्थानांची बढत झाली आहे. 2021 मध्ये कंपनीचे १२० शोरुम होते, ते आता वाढून २९५ झाले आहेत. या वर्षाच्या अखेरीस ते ३५० वर नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
महिंद्रा, टोयोटा अन् एमजीने मात्र वादळात झेंडा फडकत ठेवला...
या घसरणीच्या वादळात मारुती, टाटा, ह्युंदाईचा तंबू उखडला गेला असला तरी महिंद्राने मात्र आपला झेंडा फडकवत ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या जूनपेक्षा महिंद्राने ७००० वाहने जास्त विकली आहेत. यंदाच्या जूनमध्ये महिंद्राने ४७,३०६ वाहने विकली आहेत. हा आकडा तब्बल १८ टक्क्यांनी जास्त आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वाहन विक्रीत देखील पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोयोटाने २८,८६९ युनिट्स विकल्या आहेत. तसेच एमजी मोटर्सने देखील विक्रीत वाढ नोंदविली आहे. या जूनमध्ये कंपनीच्या कारची विक्री २१ टक्क्यांनी वाढून ५,८२९ युनिट्स झाली आहे.