सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:27 IST2025-10-17T07:26:38+5:302025-10-17T07:27:10+5:30
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाइटद्वारे धावत्या गाडीचा टोल कापण्याची सरकारची योजना तात्पुरती थांबविण्यात आली.

सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
- चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातील टोल प्लाझावर गाडी न थांबविता टोल कापता यावा, यासाठी सॅटेलाइट यंत्रणेचा वापर करण्याची योजना सरकारने आखली होती. मात्र, ऑपरेशन सिंदूरच्या अनुभवानंतर सरकारने या योजनेची अंमलबजावणी लांबणीवर ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाइटद्वारे धावत्या गाडीचा टोल कापण्याची सरकारची योजना तात्पुरती थांबविण्यात आली. परदेशी उपग्रहांचा उपयोग करून टोल प्लाझावर वाहन न थांबविता टोल कपात करण्याची यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू होते. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने परदेशी उपग्रहांवर अवलंबून न राहता स्वदेशी उपग्रह विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे.
परदेशी उपग्रहाचा वापर केला तर नागरिकांची सुरक्षा, गोपनीयता आणि डाटा आदी माहितीचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो. अशात फक्त स्वदेशी भारतीय नेव्हिगेशन सेवा वापरून वाहन चालकांसाठी सोयी-सुविधांचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
लोकेशनची गोपनीयता सर्वांत जास्त महत्त्वाची
रस्त्यावरील कोणत्याही वाहनाचे रिअल-टाइम लोकेशन प्राप्त करण्याच्या मार्गात घटनात्मक आणि सामाजिक स्वरूपाच्या समस्या जाणवत आहेत.
तज्ज्ञांनुसार, अभेद्य सुरक्षा व्यवस्था आणि गोपनीयता प्रोटोकॉलचे पालन नाही झाले, तर वाहन चालक आणि प्रवाशांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
स्थान-आधारित सेवा, डेटा स्टोरेज, प्रवेश नियंत्रण आणि कायदेशीर यंत्रणांवर व्यापक आढावा घेतला जात आहे. म्हणून लोकेशन-आधारित सेवा, डाटा स्टोरेज, प्रवेश नियंत्रण आणि कायदेशीर बाबींचा आढावा घेतला जात आहे.