रॉयल एनफील्डचा खराखुरा धमाका! जुन्या बुलेट मालकांसाठी आणले 'E20' कन्वर्जन किट; मायलेज वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:07 IST2026-02-23T14:04:59+5:302026-02-23T14:07:32+5:30
Royal Enfield E20 Kit Price: रॉयल एनफील्डने जुन्या क्लासिक आणि बुलेट मॉडेल्ससाठी E20 पेट्रोल सुसंगत कार्बोरेटर किट लाँच केली आहे. किंमत, फायदे आणि मायलेज सुधारणेबद्दल वाचा सविस्तर.

रॉयल एनफील्डचा खराखुरा धमाका! जुन्या बुलेट मालकांसाठी आणले 'E20' कन्वर्जन किट; मायलेज वाढणार
रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सध्या पेट्रोलमध्ये होणाऱ्या ईथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे जुन्या इंजिनच्या गाड्यांमध्ये तांत्रिक समस्या येत होत्या. यावर तोडगा म्हणून कंपनीने आपल्या जुन्या BS3 आणि BS4 क्लासिक, बुलेट आणि थंडरबर्ड मॉडेल्ससाठी विशेष 'E20 कार्बोरेटर कन्वर्जन किट' लाँच केली आहे.
सध्याच्या पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत ईथेनॉल असते. जुन्या कार्बोरेटर सिस्टीममध्ये या पेट्रोलमुळे इंजिनमध्ये कचरा जमा होणे, इंजिन लवकर गरम होणे आणि रबर पार्ट्स खराब होणे अशा समस्या येत होत्या. या नवीन किटमुळे या सर्व समस्या दूर होणार आहेत.
किटची वैशिष्ट्ये आणि फायदे:
ही किट विशेष अशा रबर आणि प्लास्टिक पार्ट्सने बनवली आहे, जे ईथेनॉलमुळे खराब होत नाहीत. कंपनीचा दावा आहे की, या किटच्या वापरामुळे बाईकच्या मायलेजमध्ये सुधारणा होईल आणि इंजिनचा परफॉर्मन्स अधिक स्मूथ होईल. इंजिनमधील पार्ट्स खराब होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंटेनन्सचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. ही किट जुन्या बाईकमध्ये सहज बसवता येते, यासाठी इंजिनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची गरज नाही.
किंमत आणि उपलब्धता
रॉयल एनफील्डच्या अधिकृत स्पेअर पार्ट्सनुसार, या किटची किंमत साधारणपणे १,६९० ते ३,०४० रुपयांच्या दरम्यान (मॉडेलनुसार) असण्याची शक्यता आहे. हे किट अधिकृत रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर्सवर उपलब्ध होणार आहे.