रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:51 IST2025-10-13T09:50:58+5:302025-10-13T09:51:42+5:30
Renault Kwid electric car टेस्टिंग मॉडेल अनेकदा भारतीय रस्त्यांवर दिसले आहे, ज्यामुळे ही छोटी इलेक्ट्रिक कार २०२६ पर्यंत भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी रेनोने आपल्या सर्वात लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक 'क्विड' (Kwid) चा इलेक्ट्रिक अवतार अखेरीस सादर केला आहे. ब्राझीलच्या बाजारपेठेत 'Kwid E-Tech' नावाने ही कार लाँच करण्यात आली असून, रेनोच्या इलेक्ट्रिफिकेशन धोरणातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या कारचे टेस्टिंग मॉडेल अनेकदा भारतीय रस्त्यांवर दिसले आहे, ज्यामुळे ही छोटी इलेक्ट्रिक कार २०२६ पर्यंत भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
नवीन Kwid E-Tech मध्ये कंपनीने 26.8 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही EV कार सिंगल चार्जमध्ये सुमारे 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. तिची इलेक्ट्रिक मोटर सुमारे 65 hp पॉवर जनरेट करते, जी शहरी ड्रायव्हिंगसाठी अत्यंत कार्यक्षम आहे. Kwid E-Tech ही मूळतः युरोपियन बाजारपेठेतील लोकप्रिय Dacia Spring EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
यात लेव्हल-1 ADAS सारखे प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 6 एअरबॅग्स, ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ISOFIX माउंट्स उपलब्ध आहेत.
इंटीरियरमध्ये मोठा बदल करत Kwid EV मध्ये 10.1-इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे, जो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. तसेच, 7-इंचचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 290 लीटरचा बूट स्पेसही मिळतो. डिझाइन पेट्रोल क्विडसारखीच असली तरी, क्लोज्ड ग्रिल आणि EV बॅजिंगमुळे तिला मॉडर्न इलेक्ट्रिक लूक मिळाला आहे. भारतातही याच स्पेसिफिकेशनने ही कार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
भारतात कधी?
भारतात ही कार दाखल झाल्यास, ती थेट Tata Tiago EV आणि Citroen eC3 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सला स्पर्धा देईल. क्विडने ज्याप्रमाणे पेट्रोल सेगमेंटमध्ये क्रांती केली होती, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ती सर्वात स्वस्त आणि सुरक्षित EV म्हणून ओळख मिळवू शकते.