गेल्या काही वर्षांत एसयुव्ही क्रॉसओव्हर सेगमेंटला भारतीय कारप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मारुतीची ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन सारख्या कार लोकांच्या मनात आहेत. पण आम्ही आज आणखी एक नाव सुचविणार आहोत रेनॉल्ट कॅप्चर. लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. 


रेनॉल्ट ही मुळची फ्रेंच कंपनी. युरोपचे स्टँडर्ड जरी भारतात दिलेले नसले तरीही भारतीय रस्ते आणि एकंदरीत वातावरण यानुसार केलेले बदल कारमध्ये जाणवतात. एक्स्प्रेस हायवेवर ही कार संतुलीत, वळणावर तोल जाऊ न देणारी आहे. कंट्रोलसाठीही चांगली आहे. अचानक खड्डा आला आणि ब्रेक दाबत खड्डा चुकविल्यास दणके आणि तोल गेल्याचा भास होत नाही. मुंबई-पुणे-सातारा (अंतर्गत रस्ते) असा तीन प्रदेशांचा प्रवास करताना खड्ड्यांची गणती न केलेलीच बरी. मात्र, तरीही या कारने खड्ड्य़ांचे धक्के जाणवू दिले नाहीत. मोठा खड्डा असल्यास थोडा खड्ड आवाज जरूर येत होता. स्टिअरिंग थोडे जड वाटले. 


1500 सीसीचे इंजिन असल्याने कारचा पिकअप चांगला होता. मात्र, सेकंड गिअरने काहीसे निराश केले. कार थोडी स्लो केल्यास पिकअप घेत नसल्याने इंजिन बंद पडत होते. मात्र, मांढरदेवी घाटात याच सेकंड गिअरवर फुल लोडेड असताना गाडीने चांगला पिकअप घेतला. पुण्यातील ट्रॅफिकमध्ये कारने चांगला परफॉर्म केला. मायलेजचा विचार कराल तर कारला 50 लीटरची टाकी आहे. दोन तासांची प्रचंड वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे रस्ते, एसी, रात्रीच्या प्रवासात या कारने 14 ते 15 किमी प्रति लीटरचे मायलेज दिले जे एखाद्या एसयुव्हीसाठी चांगलेच म्हणावे लागेल. या काळात थकवा किंवा बॉडीरोल जाणवला नाही. मागील सीटवर तीन माणसे आरामात बसतात. त्यांच्यासाठी एसी व्हेंटही आहे. लेग स्पेसही आहे.  

लगेज स्पेस 392 लीटरची असल्याने साहित्यही चांगलेच ठेवता येते. मोठ्या प्रवासासाठी बूट स्पेस मोठी आहे. मागची सीट 60:40 अशी फोल्डेबल नसून पूर्णच फोल्ड करता येते. ही स्पेस जवळपास हजार लीटरवर जाते. 


 

उणिवा काय जाणवल्या?
एसयुव्ही असली तरीही डोअर पॉकेटमध्ये पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी कमी म्हणजेच अर्धा लीटर बॉटलची जागा देण्यात आली आहे. रिअर व्हू मिररमुळे समोरचा काही भाग दिसत नाही. सी पिलरमुळेही वळणावर दिसत नाही. यामुळे चौकातून गाडी नेताना सांभाळावे लागते. एलईडी हेडलाईटमुळे पावसात साचलेले पाणी आणि रस्त्याचा फरक ओळखता येत नाही. यामुळे ओल्या रस्त्यावर खड्डे चुकविणे कठीण गेले. धुक्यामध्ये एलईडीच्या पांढऱ्या प्रकाशामुळे समोरची दृष्यमानता जवळपास शून्य झाली होती. फॉग लॅम्पही पांढरी लाईट फेकणारे असल्याने त्यांचाही उपयोग नाही. यावर कंपनीने काम करणे आवश्यक आहे.

 


 

चांगली कशासाठी? 
मजबूत बांधणी, कारचा पिकअप नाऊमेद न करणारा. इंजिन, टायरचा आवाज खूपच कमी. म्युझिक सिस्टीम, स्क्रीन चांगली. गिअर शिफ्टींग, क्लच स्मूथ. मायलेज चांगले. एसी कुलिंग योग्य. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर योग्य प्रकारे आणि आकर्षक मांडलेला. ब्राईटनेस कमी जास्त करता येतो. लेग स्पेस मोठी. ड्रायव्हर आर्मरेस्ट, मोठी बूट स्पेस, मागच्या सीटवर आर्मरेस्ट आणि मोठा ग्राऊंड क्लिअरन्स यामुळे ही कार उजवी ठरते. सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडीसह एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा आहे. हेडलाईट, वायपरचे कंट्रोल मात्र उलट-सुलट दिलेेले आहेत. तर म्युझिकचे कंट्रोलही स्टिअरिंगवर नसून खालच्याबाजुला दिलेले आहेत.

Web Title: Renault Captur Review: A bumpy road or a leisurely ride? detail review about European standard SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.