फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:10 IST2025-09-26T17:08:31+5:302025-09-26T17:10:12+5:30
नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुती सुझुकीने तब्बल ८०००० हून अधिक कारची विक्री केली आहे....

फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
देशभरातील बाजारांत सणासुदीची लगबग सुरू असतानाच, २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटीनंतर लोकांमध्ये वाहन खरेदी संदर्भातही मोठा उत्साह बघायला मिळत आहे. कारच्या किमतीत झालेल्या लक्षणीय कपातीचा सर्वाधिक फायदा मारुती सुझुकीला होताना दिसत आहे. कंपनीने विक्रीचे जुने विक्रमही मोडीत काढले आहेत. महत्वाचे म्हणजे, जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किंमती तर कमी झाल्या आहेतच. शिवाय कंपनीनेही आकर्षक ऑफरची भर घातली आहे. यामुळे शोरूम्सवर ग्राहकांची प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी दिसत आहे.
केवळ ५ दिवसांत तब्बल ८०००० वाहनांची वि्क्री -
नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुती सुझुकीने तब्बल ८०००० हून अधिक कारची विक्री केली आहे. याशिवाय, रोज जवळपास ८०००० ग्राहक नवीन कारबद्दल चौकशी करत आहेत. शोरूम्समध्ये एवढी गर्दी होत आहेत की, रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत गाड्यांची डिलिव्हरी करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नवीन जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुती सुझुकीने आपल्या ३५ वर्षांचा रेकॉर्ड मोडत एका दिवसात २५,००० कारची डिलिव्हरी केली होती.
मारुती सुझुकीचे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी 'बिझनेस टुडे'ला दिलेल्या माहितीनुसार, "नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीने ८०,००० वाहनांची विक्री केली आहे, तर रोज जवळपास ८०००० पर्यंत लोक चौकशी करत आहेत. आमच्या शोरूम्समध्ये प्रचंड गर्दी आहे. ग्राहकांना वाहने देण्यासाठी आमचे भागीदार रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत."
₹१९९९ चा EMI -
महत्वाचे म्हणजे, मारुती सुझुकीला कार विक्रीमध्ये मिळालेल्या या अभूतपूर्व यशामागे आकर्षक EMI योजनेची मोठी भूमिका आहे. सर्वसामान्यांना कार सहजपणे घेता याव्यात यासाठी कंपनीने एक प्रभावी EMI योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहक केवळ ₹१,९९९ प्रति महिना (EMI) भरून कार खरेदी करू शकतात. यासंदर्भात बोलताना, "यामुळे दुचाकी वाहनांच्या मालकांसाठी आता चार चाकी वाहने खरेदी करणे सोपे झाले आहे," असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.