ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:19 IST2025-07-25T09:13:26+5:302025-07-25T09:19:41+5:30
Ola S1 scooter Use For Farming news: खरेतर आज गावा गावात शेतकामाला माणसेच मिळेनासी झाली आहेत. बैल देखील परवडत नाहीत. यामुळे तुम्ही काही आठवड्यांपूर्वी वृद्ध शेतकरी जोडप्याचा बैलाच्या जागी जुंपलेला व्हिडीओ पाहिला असेल.

ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
ओला कंपनीची ईलेक्ट्रीक स्कूटर किती बहुउपयोगी आहे हे त्यांच्या मालकालाही म्हणजेच भाविश अग्रवालनाही माहिती नसेल. एवढा वेगवेगळ्या कारणांसाठी या स्कूटरचा वापर हुशार लोकांनी केला आहे. आधीच पेट्रोलवरील पैसे वाचवून या लोकांनी ईलेक्ट्रीक स्कूटर घेत डोके लढविले होते. त्यात आता या ओलाच्या स्कूटरला नांगराला जुंपून शेतीही करवून घेतली जात आहे.
खरेतर आज गावा गावात शेतकामाला माणसेच मिळेनासी झाली आहेत. बैल देखील परवडत नाहीत. यामुळे तुम्ही काही आठवड्यांपूर्वी वृद्ध शेतकरी जोडप्याचा बैलाच्या जागी जुंपलेला व्हिडीओ पाहिला असेल. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने यावर वेगळीच शक्कल लढविली आहे. यामुळे त्याचा शेतीसाठीचा खर्चही कमी झाला आहे.
लावलेल्या रोपांमधून नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्याने बैल म्हणून चक्क ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर वापरली आहे. जवळपास ३० एकर शेती हा शेतकऱ्याचा पोरगा त्याच्या वडिलांसोबत ओलाच्या स्कूटरने नांगरतो. चिक्कोडी तालुक्यात राहणाऱ्या अजित भिमप्पा यांनी अशाप्रकारे शेत नांगरले आहे.
अजित भिमप्पा यांच्या नुसार त्यांना शेती करण्यासाठी बैल मिळत नव्हते. सोयाबीनची शेतात लागवड करण्यात आली आहे. यामुळे आम्ही हा मार्ग निवडल्याचे ते म्हणाले. अजित यांनी कृषी विभागाने दिलेला नांगर ओलाच्या स्कूटरच्या मागे जोडला आहे. त्याद्वारे ते नांगरणी करत आहेत. अजित यांच्या या उपायाचा फायदा आता इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे. छोट्या ट्रॅक्टरचा खर्च देखील वाचणार आहे. पेट्रोलवरील पैसेही वाचणार आहेत. अजित यांच्या कुटुंबाने एका दिवसात दोन एकर शेती नांगरली आहे.