ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:37 IST2025-11-17T16:37:18+5:302025-11-17T16:37:54+5:30
अख्ख्या मुंबईत ओलाचे एकही सर्व्हिस सेंटर नाहीय. ठाण्यात एक सर्व्हिस सेंटर सुरु आहे. एका ग्राहकाची स्कूटर बंद पडून दीड-दोन महिने झाले आहेत. त्याच्याकडे आरएसए आहे, परंतू अद्याप त्याची स्कूटर ४० किमी दूर असलेल्या सर्व्हिस सेंटरला कंपनीने नेलेली नाही.

ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
ओला ईलेक्ट्रीकने ज्या वेगाने झेप घेतली त्याच वेगाने आता त्यांची विक्री देखील खालावली आहे. ट्रेड सर्टिफिकीट न घेतल्याने महाराष्ट्रात शोरुम बंद करण्यास लावले आहेत, तर गोव्यातील ग्राहकांना सर्व्हिस मिळत नसल्याने तेथील सरकारने ओलाच्या स्कूटरचे आरटीओ रजिस्ट्रेशनच थांबविले आहे. एवढेच नाही तर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून ओलाची सर्व्हिस सेंटरही बंद झाली आहेत. पुण्यातील फुगेवाडीचे देशातील सर्वात मोठ्या सर्व्हिस सेंटरपैकी एक असलेले सर्व्हिस सेंटर दोन-तीन महिन्यांपूर्वीच बंद झाले असून मुंबईतही हीच अवस्था आहे. यामुळे ओला स्कूटर, मोटरसायकल घेतलेले ग्राहक हैराण झाले आहेत.
अख्ख्या मुंबईत ओलाचे एकही सर्व्हिस सेंटर नाहीय. ठाण्यात एक सर्व्हिस सेंटर सुरु आहे. एका ग्राहकाची स्कूटर बंद पडून दीड-दोन महिने झाले आहेत. त्याच्याकडे आरएसए आहे, परंतू अद्याप त्याची स्कूटर ४० किमी दूर असलेल्या सर्व्हिस सेंटरला कंपनीने नेलेली नाही. घरी दुरुस्ती करण्याचे पॅकही या ग्राहकाकडे आहे. परंतू, ती सेवा देखील कंपनीने दिलेली नाही. कंपनीला मेल केला, कस्टमर केअरला वारंवार फोन केले तरीही काहीच हालचाली झालेल्या नाहीत, अशी वाईट अवस्था ओलाच्या ग्राहकांची झाली आहे. ज्यांची स्कूटर चालतेय तोवर चालतेय, एकदा बंद पडली की भंगारातच काढायची वेळ अशा ग्राहकांवर आली आहे.
पुण्यातही काही बरी परिस्थीती नाही. बंगळुरूनंतर सर्वात मोठे सर्व्हिस सेंटर आणि एक्सपिरिअंस सेंटर पुणे-पिपरी हद्दीवरील फुगेवाडी येथे होते. तिथे गाड्यांचा हा खच पडलेला असायचा. तेथील सर्व्हिस सेंटर आता तोडण्यात आले आहे. तिथे आता त्या धुळीने माखलेल्या महिनोंमहिने उभ्याच असलेल्या गाड्याही नाहीत. तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने आधी होते, आता कुठे गेले माहिती नाही, असे सांगितले आहे. ओलाच्या गाड्या आता रस्त्यावर दिसायच्याही कमी झाल्या आहेत. ओलाच्या अॅपवरून खरेदी करण्याचा प्रयत्न केला असता ओलाच्या कर्मचाऱ्याने भोसरीला नाहीतर वाकडेवाडीला सर्व्हिस मिळेल, असे सांगितले आहे. परंतू, गिऱ्हाईक करण्यासाठी हे सांगितले गेल्याची शक्यता अधिक वाटली.
अख्ख्या पुण्यात ओलाची मोटरसायकल तर दृष्टीसही पडलेली नाही, एवढा सर्व्हिसमधील चुकारपणा कंपनीवर बॅकफायर झाला आहे. ज्या लोकांनी ओलाच्या स्कूटर, मोटरसायकल घेतल्या आहेत, त्यांना कंपनीने सर्व्हिस उपलब्ध करावी, अशी मागणी या ग्राहकांनी केली आहे.
ठाण्यातही वेगळीच गंमत...
ठाण्यातही वेगळीच गंमत असल्याचे समोर आले आहे. सर्व्हिस सेंटरने बाहेर सर्व्हिस सेंटर तात्पुरते बंद केले असल्याचा बोर्ड लावला आहे. आधीच्या नादुरुस्त स्कूटर दुरुस्त होत नाहीत तोवर नवीन नादुरुस्त स्कूटर घेतली जाणार नाही, असे त्यावर लिहिले असल्याचे सुत्रांनी सांगितले.